आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे मृत्युछायेत:शिरूरला लंपी स्किनची संशयित 11 जनावरे, नमुने पाठवले प्रयोगशाळेत

अमोल मुळे | बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अंबाजोगाईपाठोपाठ आता आष्टी आणि शिरूरमध्ये लंपी स्किन आजाराची ११ संशयित जनावरे आढळली असून त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. दुसरीकडे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या गोटपॉक्स लसीचा तुटवडा आहे. सध्या तातडीने २४ हजार डोसची आवश्यकता आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३ हजार डोस मिळाले असून राज्याच्या बफर स्टॉकमधून ५ हजार डोस मिळणार आहेत.

जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी स्किन या आजाराचे रुग्ण सुरुवातीला अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडीत आढळून आले होते. यानंतर पशुसंवर्धन विभाग कामाला लागला होता. जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडी बाजारांवर निर्बंध आणले गेले होते. दरम्यान, आता आष्टी आणि शिरूर तालुक्यातही संशयित जनावरे आढळली आहेत. आष्टी तालुक्यातील देवळालीमध्ये १, इमानगावमध्ये १ आणि फत्तेवडगावमध्ये १ जनावर संशयित असून शिरूर तालुक्यातील घोगस पारगावमध्ये ३ शेतकऱ्यांची ९ जनावरे संशयित आढळून आली आहेत. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी भेट देऊन पारगावमध्ये पाहणी केली.

२४ हजार लसींची गरज, मिळाल्या केवळ ३ हजार धसवाडीत लसीकरण पूर्ण अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडीत सुरुवातीला दोन जनावरे बाधित आढळल्यानंतर तातडीने पाच किमी परिसरात २ हजार ३७३ जनावरांचे लसीकरण केल्याने तिथे साथ नियंत्रणात आली आहे.

लसीकरणासाठी धावपळ दरम्यान, ज्या भागात बाधित जनावरे किंवा संशयित जनावरे आढळून येत आहेत, त्याच्या पाच किलोमीटर परिसरात गोटपॉक्स ही प्रतिबंधात्मक लस जनावरांना दिली जात आहे. आष्टी तालुक्यातील तीन गावांतील पाच किमी अंतरात २१ हजार ५०० जनावरे असून शिरूर तालुक्यातील पारगाव परिसरात २२२३ जनावरे आहेत. दरम्यान, अातापर्यंत केवळ ३ हजार डोस प्रशासनाला मिळाले आहेत. राज्याच्या बफर स्टॉकमधून आणखी ५ हजार डोस मंजूर झाले आहेत. मात्र, जनावरांच्या तुलनेत अद्यापही लसींचा तुटवडा आहे.

जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात ^जिल्ह्यात दोन बाधित जनावरे आढळून आली होती. त्यांची प्रकृती चांगली आहे. ११ संशयितांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. लसींची उपलब्धता सध्या कमी असली तरी राज्यातच तुटवडा आहे. एकाही जनावराचा अद्याप मृत्यू नाही. पशुपालकांनी घाबरू नये. जास्तीत जास्त लसीकरण केले जाईल. स्थिती नियंत्रणात आहे. - डॉ. विजय देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. बीड

बातम्या आणखी आहेत...