आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीच्या निधनाने संसार मोडून पडला. दोन मुलांना सांभाळण्याची, त्यांना घडवण्याची संपूर्ण जबाबदारी एकटीवर आली. मात्र, अशा संकटात स्वत:कडे असलेल्या शिलाई मशीनलाच कामधेनू बनवत अंबाजोगाई येथील वर्षा घोडके यांनी संसार सावरला. यातून मुलांना उच्चशिक्षित करत स्वत:च्या पायावर उभा केले. शंभर धागे दुःखाचे सोसूनही जिद्द न हरल्याने आता एक धागा सुखाचा घोडके यांना मिळाला आहे.
अंबाजोगाई येथील वर्षा घोडके यांचे पती गंगाधर घोडके यांचा सन २००८ मध्ये मृत्यू झाला. पतीचा अकस्मात मृत्यू झाल्याने घरची सर्व जबाबदारी वर्षा घोडके यांच्यावर पडली. घराबाहेर कधीही न पडलेल्या वर्षा यांना अनेक जुजबी गोष्टींसाठी सुद्धा त्रास सहन करावा लागला.थोरला मुलगा ऋषिकेश त्यावेळी सहावी वर्गात होता तर मुलगी ऋतुजा चौथी वर्गात होती. मुले लहान, प्रपंच चालवण्यासाठी कुठलेही आर्थिक साधन नाही. त्याकरिता शिलाई काम करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
तेव्हा महिन्याकाठी अधिकाधिक दहा हजार रुपये कपडे शिवून त्यांना मिळायचे. यातून पै आणि पै वाचवून त्यांनी मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. पुढे मुलगा ऋषिकेश आणि मुलगी ऋतुजा हे बारावीनंतर पुणे येथे पुढील शिक्षणासाठी राहीले. ऋषिकेश हा बायोमेडिकल इंजिनिअरिंग चा अभ्यास करत होता तर ऋतुजा फिजिओथेरपी डिग्री कोर्सचा अभ्यास करत होती. त्यांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी घोडके यांनी नातेवाईकांकडून उसनवारीने तीन लाख रुपये घेतले. त्याची परतफेड शिलाई काम करून केली. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व सहकारी बँकांमध्ये एक वर्ष चकरा मारल्या. परंतु पत नसल्याकारणाने बँकांची नकारघंटा मिळत होती. सामाजिक संस्थांनीसुद्धा हातभार लावण्यात असमर्थता दर्शवली. नातेवाईकांकडून उसनवारीने घेतलेले पैसे व शिलाई कामातून मिळालेले उत्पन्न यामधून दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवावा लागला.
आईच्या या कष्टांची जाणीव ठेवत मुलांनीही नेटाने अभ्यास केला. दोन्ही भावंडांनी केवळ एकवेळचा डबा लावून दिवस काढले. मात्र आईने जेवण झाल्याचे विचारताच ते दोघेही फक्त ‘हो’ म्हणून उत्तर द्यायचे. याच कष्ट आणि जिद्दीतून ऋषिकेश हा बायोमेडिकल इंजिनियर असून पुणे येथे नामांकित रुग्णालयात नोकरीस आहे. मुलगी ऋतुजा हिने सुद्धा पदवी पूर्ण करून फिजिओथेरपिस्ट म्हणून पुणे येथील मोठ्या रुग्णालयात नोकरी सुरू केली आहे. दोघांना आता समाधानकारक पगार मिळत असून वर्षा यांच्या संघर्षाचा हा विजय आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शिक्षणाची उणीव अखेर भरून निघाली
पोरांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दररोज १२ तासाहून अधिक शिलाई काम केले. आजही मी शिलाई काम करते. स्वतःला दहावीपेक्षा जास्त शिक्षण घेता आले नाही. मुलांवरही तीच वेळ येऊ नये, यासाठी कष्ट करत राहिले. स्वतःच्या बाबतीत असलेली शिक्षणाची उणीव मुलांच्या माध्यमातून भरून निघाल्याचा आनंद असल्याचे वर्षा घोडके सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.