आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:पोहणे शिकताना निसटली ट्यूब, स्विमिंग पूलमध्ये बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू; पाटोद्यात प्रशिक्षकाविनाच सुरू होते जलतरण, लोकांचा संताप

पाटोदा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका अत्याधुनिक जलतरण तलावात मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अजिंक्य मोहन कोठुळे (रा. जवळा, ता. पाटोदा, जि. बीड) असे मृत मुलाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, अजिंक्यने परिधान केलेली ट्यूब निसटली व तो खोल पाण्यात बुडाला. येथे स्विमिंग शिकवणारा प्रशिक्षित नसल्याचे सांगत नागरिकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली.

अजिंक्य हा आजोबा तात्यासाहेब महादेव वीर यांच्याकडे आपल्या आईसह मागील काही दिवसांपासून राहत होता. पारगाव रस्त्यानजीक डॉ. आर.बी. डिडूळ यांचे हॉस्पिटल असून त्याच परिसरात त्यांनी जलतरण तलाव बांधला आहे. शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान अजिंक्य काही मित्रासांह या ठिकाणी आला होता. जलतरण तलावात हे सर्व मित्र पोहत असताना अजिंक्य हा अचानक पुढील बाजूस साधारणतः आठ ते दहा फूट खोली असलेल्या भागाकडे गेला व ही घटना घडली. दरम्यान, तो बुडत असल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही तसेच त्या ठिकाणी देखरेखीसाठी असणारा कर्मचारीदेखील त्याच वेळी काही कामानिमित्त बाहेरच्या दालनात गेला होता.

नागरिकांची कारवाईची मागणी
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जमाव जमला. जलतरण तलावासाठी योग्य प्रशिक्षक नसताना व सुरक्षिततेसाठीची कोणतीही उपाययोजना नसताना मुलांना पोहण्यासाठी कसे सोडले जाते, असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस अधिकाऱ्यांची भेट
पोलिस निरीक्षक डी.बी. कोळेकर, पीएसआय आर.व्ही. पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत तात्यासाहेब महादेव वीर यांनी दिलेल्या माहितीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...