आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेचे रुपडं ग्रामस्थांच्या पुढाकारातून पालटले आहे. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. आतापर्यंत ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेला १५ लाख रुपयांचा खर्च केला असून नुकताच साडेपाच लाख रुपयांचा संगणक कक्ष तयार करुन लोकार्पण करण्यात आले. टाकरवण येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे.
शाळेमध्ये २५२ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेची सरकारी शाळाही खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकून रहावी यासाठी मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेत मागील चार वर्षात १५ लाख रुपयांची वर्गणी करुन शाळेला दिली आहे. यातून शाळेच्या वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत.
वृक्षारोपण व वृक्ष संगोपन केले गेले आहे. वर्गांमध्ये फॅन, एलईडी टिव्ही आणि विजेची जोडणीही दिली गेली आहे. शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसवण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले गेले आहेत. पोषण आहाराच्या किचन शेडचे काम केले गेले असून भाज्या खराब होऊ नयेत यासाठी फ्रिज उपलब्ध करुन दिला आहे. संरक्षण भिंतीचे काम करुन प्रवेशद्वार बसवले आहे.
अत्याधुनिक संगणक कक्ष
गावकऱ्यांनी साडेपाच लाख रुपये खर्चून अत्याधुनिक संगणक कक्ष उभारला आहे. यामध्ये एकूण १६ संगणक उपलब्ध करुन दिले गेले आहेत. शनिवारी या संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अडचणींवर मात करून काम
गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळेचे रूपडे पालटल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद गोबर म्हणाले तर, कोरोनात अडचणी येऊनही ग्रामस्थांनी काम सुरु ठेवले त्यामुळे शाळा डिजिटल झाली असून याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे मुख्याध्यापक रत्नाकर वाघमारे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.