आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ऑगस्ट महिन्यात राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्यासाठी ’अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत बीड विभागातून ऑगस्ट ते नोव्हेंबर या ४ महिन्यात १६ लाख ६९ हजार २५ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा आनंद लुटला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची ज्येष्ठ नागरिकांना भेट म्हणून एसटी महामंडळातर्फे २५ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ केला या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना राज्याच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येतो. बीड विभागात अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. ऑगस्ट , सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या चार महिन्यात १६ लाख ६९ हजार २५ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास करुन या योजनेचा लाभ घेतला. दर महिन्याला या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढतच आहे.१६ लाख ज्येष्ठांच्या अमृत योजनेतील प्रवासापोटी लाल परीच्या तिजोरीत १० कोटींच्या उत्पन्नाची भर पडली आहे. चार महिन्यांत एसटीला या उपक्रमातून १० कोटी ५ लाख ३६ हजार ५४७ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
अंबाजोगाई आगाराचे सर्वाधिक प्रवासी
परळी आगारातून २ लाख ३१ हजार ७८३ जणांनी, धारूर २ लाख २ हजार २२६, माजलगाव २ लाख ३८ हजार ५३६, गेवराई १ लाख ८१ हजार ६१ ज्येष्ठांनी, पाटोदा १ लाख ४२ हजार ११८, आष्टी आगारातून ८५ हजार २० आणि अंबाजोगाई आगारातून ३ लाख ७८ हजार ६०२ जणांनी प्रवास केला.
प्रतिसाद वाढतो आहे
जिल्ह्यात अमृत ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास या योजनेला ज्येष्ठांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. प्रवासात ज्येष्ठांना चांगली सेवा मिळावी याबाबतही सूचना दिल्या आहेत. ज्येष्ठांची हेळसांड होणार नाही याची काळजी राज्य परिवहन महामंडळाकडून घेतली जात आहे. -अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, रापम, बीड
ओळखपत्र दाखवा; लाभ मिळवा या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, केंद्र, राज्य शासनातर्फे निर्गमित केलेल्या ओळखपत्रापैकी कुठलेही एक वयाचे ओळखपत्र आवश्यक आहे. वरीलपैकी कोणतेही ओळखपत्र दाखवल्यास ७५ वर्षांवरील मोफत प्रवास करता येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.