आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा:आषाढीसाठी 180 ज्यादा बसेस; विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांची माहिती

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन सोयीचे व्हावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ८ आगारांमधून १८० ज्यादा बसेसची व्यवस्था केल्याची माहिती विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.

१० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी हा मोठा उत्सव असतो. पांडुरंगाला भेटण्यासाठी शेकडो किलोमीटर भाविक दिंडीतून पायी जातात. कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या काळात पंढरीची वारीच न झाल्याने यंदा भाविकांत मोठा उत्साह आहे.

६१ हजार प्रवाशांनी केला होता २०१९ मध्ये प्रवास
यापूर्वी सन २०१९ मध्ये आषाढी वारीसाठी बीडहून राज्य परिवहन महामंडळाने १३० ज्यादा बसेस सोडल्या होत्या. या बसेसमधून ६१ हजार ७७६ प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा बसेसची ही संख्या वाढवून १८० केली असून लाखभर प्रवासी प्रवास करतील अशी शक्यता राज्य परिवहन महामंडळाला आहे.

८ आगारातून धावणार बसेस
राज्य परिवहन महामंडळाने ८ आगारांमधून १८० ज्यादा बसेसची व्यवस्था केली आहे. ५ जुलै ते १३ जुलैपर्यंत या ज्यादा बसेस धावणार आहेत. तर, १३ जुलै हा पौर्णिमेचा दिवस आहे. पौर्णिमेला काला करून अनेक भाविक परतीला लागतात. कोरोनाच्या २ वर्षाच्या खंडानंतर यंदा मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जातील असा अंदाज आहे.

४५ प्रवासी असतील तर तत्काळ बससेवा उपलब्ध होणार
ज्यादा बस व्यतिरिक्त एखाद्या गावातून,संस्थेचा, बचत गटाचा ४५ व्यक्तींचा समूह पंढरपूरसाठी जाणार असेल तर तत्काळ बस उपलब्ध करून दिली जाईल. अशा समूहांनी जवळच्या आगारांशी संपर्क साधावा.
-अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, एसटी, बीड