आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:पोलिस उशिरा आल्याने 2 तास वाहतूक ठप्प; 50 फूट उंच उडाला तरुण

वडवणी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुटखा वाहतूक करणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार झाल्याची घटना वडवणीजवळील विजयराज ऑइल इंडस्ट्रीजवळ गुरुवारी (१६ जून) दुपारी २ वाजता घडली. अपघातानंतर चालकाने कारमधील गुटखा दुसऱ्या वाहनात टाकून पळ काढला. हे पाहून दुचाकीस्वाराच्या नातेवाइकांनी बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर एकत्र येत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी २ किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वडवणी व पिंपळनेर पोलिसांना अपघाताची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्यानंतर तब्बल २ तासांनंतर पोलिसांनी वाहतूक मोकळी केली.

तालुक्यातील ढोरवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या गाडीउतार तांड्यावरील रवी ऊर्फ भय्या बळीराम चव्हाण (२२) हा तरुण वडवणीहून बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावरून तांड्याकडे दुचाकीने (एमएच २० एफएच १६१८) निघाला होता. याच वेळी महामार्गावर समोरून गुटखा घेऊन जाणाऱ्या कारने (एमएच ०३ बीसी ०४५३) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात तरुणाचा एक हात खुब्यापासून वेगळा होऊन डोक्याला गंभीर मार लागला. हा भीषण अपघात पाहून संतप्त नातेवाइकांनी एकत्र येत तातडीने कार चालकाला पोलिसांनी अटक करावी, या मागणीसाठी आक्रोश करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गुटखा दुसऱ्या वाहनात भरून काढला पळ; २ गोण्या झुडपात
वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होतोय. याकडे पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता (एमएच ०३ बीसी ०४५३) ही कार वडवणीकडे गुटखा घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शी राजू चव्हाण, सर्जेराव चव्हाण यांनी पाहिले होते. तरुणाचा मृत्यू झाल्याचे पाहून अपघातग्रस्त कारचालकाने त्या कारमधील गुटखा (एमएच १७-४३५६) या दुसऱ्या कारमध्ये भरून गायब केला. याच वेळी गुटख्याने भरलेल्या दोन गोण्या बाजूला असलेल्या झुडपात राहून गेल्या.

५० फूट उंच उडून शंभर फूट खड्ड्यात पडला
हा अपघात एवढा भीषण होता की, तरुणाचा मृतदेह पन्नास फूट उंच उडून शंभर फुटांच्या खड्ड्यात जाऊन पडला. मेंदूचा चुराडा झाला होता, तर उजवा हात खुब्यापासून वेगळा होऊन रस्त्यावर पडला होता. या वेळी तरुणाच्या कानात मोबाइलला कनेक्ट केलेला हेडफोन पन्नास फूट उंच झाडावर लटकला होता.

फोन केल्यानंतर दोन तासांनी आले पोलिस
बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शींनी पिंपळनेर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर २ तासांनी पोलिस अपघातस्थळी आले. तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिंपळनेर पोलिस उशिरा आल्याने पोलिसांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

बातम्या आणखी आहेत...