आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:बीड जिल्ह्यातील 2 शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार, शशिकांत कुलथे व सोमनाथ वाळके पुरस्काराचे मानकरी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षकदिनी प्रदान करण्यात आले. यात मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीडच्या गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण) राकेश रंजन, यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोमनाथ वाळके यांनी लोकसहभागातून शाळेसाठी १५ लाखांपेक्षा अधिक निधी उभारून शाळेचा कायापालट केला. शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ झाली, शाळेत रेकॉर्डिंग स्टुडिओ, म्युझिक स्टुडियो उभे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळू लागला. रोबोटिक, कोडिंग, ड्रोन संदर्भातील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. गेवराई तालुक्याच्या दामू नाईक तांडा येथील शिक्षक शशिकांत कुलथे हे ज्या शाळेत शिकवतात, त्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे बंजारा समाजातील आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांची भाषा ‘बंजारा’ असल्याने त्यांना प्रमाण मराठी भाषा यावी, यासाठी बंजारा आणि मराठी भोषेचे सचित्र पुस्तकाचे लेखन करून बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे येण्याचा प्रयत्न कुलथे यांनी केला. संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कवितेत गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात. शाळेतील विद्यार्थी मराठी, इंग्रजीतून आयसीटी, जॉयफूल शिक्षण प्रणालीअंतर्गत येणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

बातम्या आणखी आहेत...