आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविडा (ता.केज) येथे निजाम काळापासून धूलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून रंगांची उधळण करीत सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा गावकऱ्यांनी जपली आहे. मंगळवारी (दि. ७) धूलिवंदन असल्याने जावयाच्या शोधत तरुणांची पथके मार्गस्थ झाली आहेत.
दरम्यान, गावात स्थायिक असलेले २०० जावई भूमिगत झाले आहेत. त्यामुळे कोणत्या जावयांची गर्दभ सवारी निघणार? याकडे लक्ष लागले आहे.
अशी सुरू झाली परंपरा
तालुक्यातील विडा हे ७ हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर असून गावात साधू शिव रामपुरी महाराजांची संजीवन समाधी आहे. या गावाने मध्ययुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लळीत नाट्याची परंपरा १०० वर्षांपासून जपली आहे. निझामकाळात गावाला जहागिरी होती. १९१५ साली जहागीरदार तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळा नाथ चिंचोली (जि.लातूर) येथील मेव्हणे धूलिवंदनाच्या दिवशी सासुरवाडीत आले होते. त्यावेळी परंपरेप्रमाणे भांग पिऊन थट्टामस्करी सुरू झाली. मस्करी तून जावयाची गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.
जावयाला करतात आहेर
परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन जावई शोध समिती नेमतात. एका जावयास ताब्यात घेऊन धुळवडीपर्यत निगरानीखाली ठेवले जाते. धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून चपलेचा हार घालून मिरवणुकीला सुरू होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक हनुमान मंदिरासमोर पोचते. या ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. शिवाय जावईबापूला सासऱ्याच्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठी भेट दिली जाते.
गावात एकोपा व सलोखा
जावयाची गाढवावरून मिरवणूक हा अपमानाचा प्रकार वाटतो परंतु, ही गावाची परंपरा मानून आज पर्यंत मिरवणुकीत कधीही भांडण झाले नाही.अगदी मुस्लिम धर्मातील सादेक कुरेशी यांनाही या मिरवणुकीचा मान मिळाला आहे.
तीन पिढ्यांना मिळाला मान
गावातीलच सासरे, त्यांचेही जावई आणि पुन्हा त्यांचेही जावई अशा चौघांना हा मान मिळालेला आहे. दिवंगत देवराव मस्कर यांना मान मिळाला होता. त्यांच्या मुली गावातील चंद्रसेन पवार व महादेव पवार यांना दिलेल्या आहेत. हे दोन्ही पवार जावयांची मिरवणूक निघाली होती. महादेव पवार यांची मुलगीही गावातील अंगद देठे यांना दिली आहे. देठे यांचीही मिरवणूक निघाली. घोरपडे यांचे जावई एकनाथ पवार व त्यांचे जावई महादेव घोरपडे यांनाही मान मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.