आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रतीक्षेत:260 शेतकऱ्यांच्या 3 हजार 869 क्विंटलची झाली आतापर्यंत खरेदी; 21 मार्चला केला होता शुभारंभ

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 300 शेतकरी प्रतीक्षेत; दीड हजार क्विं. हरभरा मापाविना

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत दराने हरभरा खरेदीसाठी परवानगी दिलेल्या केज येथील खरेदी-विक्री संघाच्या हरभरा खरेदी केंद्रावर ५६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी २६० शेतकऱ्यांचा ३८६९.९५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. ३०३ शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत राहिले आहेत.

केज तालुक्यात रब्बी हंगामात यंदा २९ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा केला होता. हरभऱ्याचे उत्पन्न समाधानकारक निघाले आहे. हरभरा विक्री करण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार हरभरा खरेदीसाठी नाफेडमार्फत बीड जिल्ह्यात खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अगोदर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आली होती.

हरभरा खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेल्या केज येथील तालुका खरेदी-विक्री संघाकडे तालुक्यातील ५६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. नोंदणीनंतर २१ मार्चला संघाच्या खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता. तर खरेदी-विक्री संघाकडून ऑनलाइन नोंदणीच्या क्रमवारीनुसार हरभरा घालण्यासाठी येण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मोबाइलवर मेसेज पाठवून कळवले आहे.

त्यानुसार संघाकडून २८ मेपर्यंत २६० शेतकऱ्यांचा ३८६९.९५ क्विंटल हरभरा ५ हजार २२० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे. आणखी नोंदणी केलेल्या ३०३ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याचा राहिला आहे. पूर्वी २९ मेपर्यंत हरभरा खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. ही खरेदीची मुदत संपताच खरेदीची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र हरभरा खरेदीसाठी १८ जूनपर्यंत मुदत वाढवून देण्यात आल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दीड हजार क्विंटल हरभरा पडून, वाहने आहेत उभी
खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात ७३ शेतकऱ्यांनी आणलेले हरभऱ्याचे १ हजार ९७४ कट्टे पडून असून जवळपास १ हजार ५०० क्विंटल हरभरा माप करण्याच्या प्रतीक्षेत आहे. या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांनी वाहनातून कट्टे उतरले नसल्याने वाहने उभी आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना रात्रंदिवस राखण बसावे लागत आहे. याचा विचार करून लवकरात लवकर माप करावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

बारदाना, विद्युत पुरवठ्यावरून खरेदीत खंड
हरभरा खरेदी केंद्रावर खरेदी केलेला हरभरा भरून ठेवण्यासाठी पुरवण्यात येणारा बारदाना (कट्टे) हे कोलकाता येथून पुरवण्यात येतात. उपलब्ध बारदाना संपताच खरेदी बंद ठेवली जात होती. शिवाय इलेक्ट्रॉनिक चाळणीसाठी लागणारा विद्युत पुरवठा खंडित राहिल्यासही खरेदीत खंड पडतो. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे माप दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, अशी मागणी उर्वरित शेतकऱ्यांनी केली आहे.

मंगळवारपासून खरेदीस सुरुवात
पूर्वी हरभरा खरेदीसाठी २९ मेपर्यंत मुदत दिली होती. सोमवारी १८ जूनपर्यंत खरेदीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. लवकरच खरेदी केंद्रावर हरभऱ्याचे माप घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.
- बिभीषण ठोंबरे, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ, केज.

बातम्या आणखी आहेत...