आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यबळाचा अभाव:केजच्या कृषी कार्यालयात 88 पैकी 33 पदे रिक्त; खरिपात येणार अडचण

केज16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील तालुका कृषी कार्यालयात मंजूर असलेल्या ८४ पदापैकी ५१ पदे भरलेली असून तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. तर रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढलेला असून शेतकऱ्यांची कामे ही वेळेवर होत नाहीत. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर रिक्त पदाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

केज येथील तालुका कृषी कार्यालयातील प्रमुख असलेले तालुका कृषी अधिकारी पद भरलेले आहे. मात्र कार्यालयातील महत्वाचे एकमेव असलेले सहाय्यक अधिक्षकांचे रिक्त आहे. तर केज, आडस, युसूफवडगाव, मस्साजोग ही चार मंडळे येतात. प्रत्येक मंडळात एका मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह १२ कृषी सहाय्यकांची पदे मंजूर आहेत. मात्र ५ मंडळ कृषी अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना तीन मंडळ कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर सध्या २ मंडळ कृषी अधिकाऱ्यांवर मंडळाचा कारभार सुरू आहे. तर कृषी सहाय्यकांची ३३ पदे मंजूर असताना केवळ १७ पदे भरलेली आहेत.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात असलेल्या कृषी सहाय्यकाची तब्बल १६ पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक मंडळातील कृषी सहाय्यकांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. परिणामी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह कृषी सहाय्यकांवर अतिरिक्त पदाच्या कामकाजाचा ताण वाढलेला आहे. कृषी कार्यालयात कनिष्ठ लिपिकाची पदे ४ मंजूर असताना २ पदे भरलेली आहेत. मात्र २ पदे रिक्त असल्याने कामकाजात सुलभता राहिलेली नसून अतिरिक्त कामामुळे कामकाजास विलंब होत आहे.

शिवाय या कार्यालयात शिपायांची ७ पदे मंजूर असताना ५ पदे रिक्त असून २ शिपायांवर संपूर्ण कारभार सुरू आहे. कार्यालयासह मंडळ अधिकारी कार्यालयातील स्वच्छतेच्या कामासह इतर कामावर रिक्त पदामुळे परिणाम झाला आहे. तर अनुरेखकाची सर्व ५ पदे रिक्त असून या पदाची भरती मागील १० वर्षापासून विभागाने बंद केली आहे. त्यामुळे पदाचे कामकाज आता इतर पदावर असलेली व्यक्ती करीत आहे.

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळवून देता याविषयीचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. मात्र मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या रिक्त पदामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. बियाण्याची उगवण क्षमता तपासणी, माती परीक्षण, बियाणे, खते, कीड नियंत्रण व इतर महत्वाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन देणे गरजेचे आहे. मात्र रिक्त पदांमुळे ही कामे कासवगतीने होत आहेत. शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

कर्मचाऱ्यांना करावा लागतोय शेतकऱ्यांच्या रोषाचा सामन
विभागीय कृषी संचालकांना पदे भरण्याचे अधिकार असून या वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी रिक्त पदांची माहिती पाठविली जाते. शिवाय रिक्त पदे भरण्यासंदर्भात पाठपुरावा केला जातो. मात्र रिक्त पदावर नियुक्ती केली जात नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कार्यालयाचे रेटून नेले जात आहे. कामाचा बोजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचा रोष घ्यावा लागत आहे.

मेळावे, कार्यक्रम होईनात
शेतकऱ्यांच्या कार्यशाळा, मेळावे, कीड व रोग नियंत्रणासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम व इतर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यासाठी रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम मोजक्याच ठिकाणी घेतली जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...