आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळीतील डॉ. सुदाम मुंडे यांच्या अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणामुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात बीड येथील अवैध गर्भलिंग निदान करणारे आणखी एक रॅकेट समोर आले आहे. गेवराईत २५ हजारांत अंगणवाडी सेविकेच्या मदतीने गर्भलिंग निदान केल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी गर्भपातासाठी बीड येथील एका पॅथॉलॉजी लॅब चालकाच्या ओळखीतून एका परिचारिकेशी संपर्क केला. ३५ हजार रुपयांत गर्भपाताचा व्यवहार ठरला होता. गर्भपातानंतर स्त्री जातीचे भ्रूण जाळून टाकून नष्ट केले गेले. यात पाच जणांवर गुन्हा नोंदवला गेला. या पैकी संशयित परिचारिकेने आत्महत्या केली. तर अटकेत असलेल्या तीन आरोपींना १४ जून पर्यंत न्यायालयाने पाेलिस कोठडी सुनावण्यात आली. तर महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली.
बीड तालुक्यातील बकरवाडीतील सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (३०) या चौथ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेचा अतिरक्तस्रावाने रविवारी मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिस व आरोग्य विभागाने केलेल्या तपासात गर्भलिंगनिदान करुन नंतर गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला गेला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केली एसपींशी चर्चा
नीलम गोऱ्हंेकडून दखल
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात पीसीपीएनटीडी समिती स्थापन करुन अवैध गर्भपात राेखावेत, गर्भपाताबाबत एसओपी तयार करावी, या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवता येतो का, याबाबतही त्यांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा केली.
एमसीआरवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात सखोल तपास आवश्यक असताना अंगणवाडी सेविका महिलेच्या न्यायालयीन कोठडीची पोलिसांनीच मागणी केली. यावर प्रश्न निर्माण झाला. परंतु, महिलेची मानसिकता चांगली नाही त्यामुळे पोलिस कोठडी पुन्हा मागण्याचा हक्क अबाधित ठेवून एमसीआरची मागणी केली, असे डीवायएसपी संतोष वाळके यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयात नकार
मुलगी नको असल्याने सिताबाई यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्भपाताचा प्रयत्न केला. मात्र, गर्भ १८ आठवड्यांचा असल्याने रुग्णालयाने गर्भपातास नकार दिला. यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी बीड येथील लॅबचालक वासुदेव गायके याच्या ओळखीतून सिमा डोंगरे या परिचारिकेशी संपर्क साधला. ३५ हजारांत गर्भपात करण्याचे ठरलेे. ५ जून रोजी पहाटे बकरवाडीत गर्भपात केला गेला. स्त्री भ्रूण जाळून नष्ट केले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने सिताबाईंचा मृत्यू झाला.
औरंगाबाद कनेक्शन
गर्भलिंग निदान प्रकरणाचे औरंगाबाद कनेक्शन पोलिस तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गर्भलिंग निदान करण्यासाठी अंगणवाडी सेविकेकडे येणारा डॉक्टर हा औरंगाबाद जिल्ह्यातून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन येत होता.
मुलगी नकाे म्हणून... : सीताबाई या ऊसतोड कामगार असून त्या नोव्हेंबर २०२१ मध्ये ऊसतोडणीसाठी सातारा जिल्ह्यात गेल्या होत्या. मे २०२२ मध्ये त्या परत आल्या त्या वेळी त्या गर्भवती होत्या. पहिल्या तीन मुली असल्याने त्यांना आता मुलगा हवा होता. गेवराई येथील मनीषा हिच्याशी संपर्क साधून त्यांनी २५ हजार रुपयांत गर्भलिंगनिदान करण्याचे ठरले. २ जून रोजी सीताबाई यांना घेऊन त्यांचे सासरे सानप यांच्याकडे गेले व गर्भलिंग निदान केले. यात, भ्रूण हे स्त्री जातीचे असल्याचे समोर आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.