आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची पिकांना गरज:पाच दिवसांत 44.5 मिमी नोंद, दमदार पावसाची पिकांना गरज

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिकांच्या ऐन वाढीच्या काळातच दीर्घकाळासाठी वरुणराजाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सात लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांसमोर संकट निर्माण झाले होते. चातकाप्रमाणे बळीराजा पावसाची वाट पाहता होता. सप्टेंबर महिन्यात, गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. १ ते ५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ४४.५ मिमी पावसाची नोंद झाली असून आणखी दमदार हजेरी होण्याची गरज आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. यंदा पावसाळा चांगला जाईल, अशी आशा शेतकऱ्यांनाही होती. त्यानुसार जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. शेतकऱ्यांनी सात लाख हेक्टरवरून अधिक क्षेत्रावर पेराही उरकला. परंतु, ऑगस्ट महिन्यात ऐन पीक वाढीच्या काळातच पावसाने दीर्घ काळ दडी मारली.

त्यामुळे अनेक ठिकाणी २० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी ते ठिबक, तुषार सिंचनाच्या माध्यमातून देऊन पिके जगवली. परंतु, पावसाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतही हजेरी न लावल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला होता. ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात हलक्या मेघसरींनी हजेरी लावत पुनरागमन केले. यासोबतच १ सप्टेंबरपासून ढगाळ वातावरण राहत असून जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी राहत आहे. परिणामस्वरूप पावसासाठी आसुसलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. अजून पावसाची गरज आहे.

६८.३१ टक्के पावसाची नोंद
जिल्ह्याची वार्षिक पर्जन्य सरासरी ६९९.३० मिमी इतकी असून ऑगस्टअखेरीस जिल्ह्यात ४३२.६ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली होती. गेल्या पाच दिवसांत ४४.९ मिमी असा पाऊस नोंद झाला असून ५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत पर्जन्यवृष्टीचा आकडा ४७७.५ मिमीपर्यंत पोहोचला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ६८.३१ टक्के इतका आहे.

बातम्या आणखी आहेत...