आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटल मंजूर:अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात 50 बेडचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर

अंबाजोगाई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारच्या एबीएचआयएम योजनेतून तातडीने होणार काम

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र शासनाच्या पंतप्रधान एबीएचआयएम या योजनेअंतर्गत ५० बेडचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर करण्यात आले. या हॉस्पिटल निर्मितीसाठी ४ कोटी रुपये खर्चून तातडीने नवीन इमारत उभी करण्याच्या सूचना येथील अधिष्ठाता कार्यालयास देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग आयुक्त व आरोग्य सेवा व अभियान संचालक कार्यालयाकडून १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र प्राप्त झाले. त्यानुसार चालू २०२२-२३ या वर्षात केंद्र शासन पुरस्कृत पीएम एबीएचआयएम या योजनेअंतर्गत अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर झाले. या हॉस्पिटलच्या नवीन बांधकामासाठी महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात २,५०० चौरस मीटर जागा आवश्यक आहे. इमारत उभारणीसाठी साइट असाइनमेंट पूर्ण करण्याच्या दृष्टीने अशी जागा त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. योजनेसाठी जेपीडगो ही डेव्हलपमेंट पार्टनर संस्था तांत्रिक बाबतीत मदत करणार आहे. त्यांच्या तंत्रज्ञांच्या मदतीने मंजूर ठिकाणी भेट देऊन पायाभूत सुविधा, विकास कक्ष असा डीपीआर तयार करून क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्यात येणार आहे.

ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला २५-२५ बेड क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये ग्राउंड फ्लोअरला २५ तर फर्स्ट फ्लोअरसाठी २५ बेड अशा एकूण ५० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर १० बेड आयसीयू झोन (पीडियाट्रिकसाठी २ बेड आरक्षित), ६ बेडचा एचडीयू झोन (पीडियाट्रिकसाठी २ बेड आरक्षित), २५ बेडचा आयसोलेशन वॉर्ड, दोन स्वतंत्र रूम, २ बेडची डायलिसिस रूम, २ बेडची एमसीएच रूम, ५ बेडची इमर्जन्सी रूम, डॉक्टर, परिचारिका, औषध सामग्री, स्वच्छता व इतर आवश्यक बाबीसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.

हॉस्पिटल उभारणीसाठीची प्रक्रिया सुरू केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या नवीन इमारत उभारणीसाठी बांधल्या जाणाऱ्या बाह्यरुग्ण सेवा विभागाच्या शेजारील मोकळी जागा व इतर जागांसंबंधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. क्रिटिकल केअर हॉस्पिटल उभारणीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, स्वाराती, अंबाजोगाई.

बातम्या आणखी आहेत...