आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:बीड जिल्ह्यात ५०% उपयुक्त पाणीसाठा; मात्र, विजेअभावी दीडशेवर गावांमध्ये टंचाईच्या झळा

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्च अखेरीस जिल्ह्यात प्रथमच मुबलक उपयुक्त साठा, केवळ चार लघुप्रकल्प कोरडे

गतवर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांना मोठा दिलासा मिळाला. परिणामी मार्च महिना अखेरीस कधी नव्हे ते जिल्ह्यात ४९.९९ टक्के म्हणजेच ४४५.८९३ दलघमी इतका उपयुक्त साठा शेष आहे. केवळ चार लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. असे असले तरी महावितरणची थकबाकी असल्याने दीडशेहून अधिक गावच्या जल योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने या गावांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ६६६.३६ मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या बीड जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ४० टक्केच पाऊस झाला होता. परंतु परतीच्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली अन‌् नोव्हेंबर २०२० मध्ये जिल्ह्यातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले.

तीन वर्षांपासून मृत पातळीत असलेला मांजरा प्रकल्पही काठोकाठ भरला. मांजरा व माजलगाव हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा जिल्ह्याला दिलासाच मिळाला. शिवाय गेवराई, माजलगाव परिसरातील काही गावांत जायकवाडीच्या कालव्यातील पाण्यामुळे सिंचनाचाही प्रश्न दूर झाला. एकीकडे दिलासादायक चित्र असताना मध्येच महावितरणची थकबाकीविरोधी मोहीम सुरु झाली अन‌् जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांसमोर अडचण उभी ठाकली. महावितरणने धारूर तालुक्यातील १८, शिरूर तालुक्यातील ४६, परळी तालुक्यातील ४२, आष्टी तालुक्यातील २३ गावांचा वीजपुरवठा वीज थकबाकी ठेवल्यामुळे खंडित केला आहे. यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही किमान तीन ते चार गावांत अशीच परिस्थिती आहे.

थकबाकीमुळे जल योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागात जलाशयांत पाणी असतानाही केवळ विजेअभावी पाणीप्रश्न अधिक तीव्र बनला आहे. त्यामुळे दीडशेहून अधिक गावांत हंडे घेऊन पाणी आणण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपलीये. राज्य शासनाने वीज बिलातून सूट द्यावी किंवा पावसाळ्यापर्यंत तरी जोडणी अखंडित ठेवावी, जेणेकरून टंचाईच्या झळा भासणार नाहीत.

जिल्ह्यात ४९.९९ टक्के म्हणजेच ४४५.८९३ दलघमी इतका उपयुक्त साठा शेष आहे
जिल्ह्यात ४९.९९ टक्के म्हणजेच ४४५.८९३ दलघमी इतका उपयुक्त साठा शेष आहे

या गावांत पाणीटंचाई
केरूळ, मोरेवाडी, कोयनी, राळसांगवी, भोगलवाडी, काठेवाडी, सोनीमोहा, चिखलबीड, पिंपळटक्का, रूई पिंपळा, कान्होबाची वाडी, शिवनगर तांडा, मेघना तांडा, डोंगराची वाडी, टोकवाडी, कारळवाडी, पिंपरवाडा, चिंचपूर, मलकापूर, हाळंब, येळंब यासह जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांत सध्या विजेअभावी पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे महिलांना पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.

ग्रामपंचायतीकडे निधी नाही
वीजपुरवठा खंडित झाल्याने सध्या गावातील महिला, नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करण्याची वेळ आली आहे. एकीकडे ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नाही. लोकांकडे कर भरायला पैसे नाहीत. मग जलयोजनेची बाकी भरणार कशी? शासनाने मध्यस्थी करून जलयोजनेसाठी तरी वीज देऊन पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी दहिवंडी (ता.शिरूर) येथील सरपंच शीला आघाव यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...