आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. दाखल झालेल्या अर्जांमध्ये सरपंचपदासाठी ५२ टक्के म्हणजे २ हजार २१८ अर्ज तर सदस्यांसाठीचे ५६ टक्के म्हणजे ११ हजार २७० अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले. ५ दिवसांत सरपंचासाठी ४ हजार २१६ तर सदस्यांसाठी १९ हजार ८१६ असे एकूण २४ हजार ७७ दाखल झाले आहेत. आतापर्यंतच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील अर्जांचा हा उच्चांक आहे.
डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७४६ जागांसाठी सध्या जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या ५० टक्क्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळी होत असल्याने हा मोठा टप्पा आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महसूल, पोलिस यंत्रणा सध्या काम करत आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर ही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत होती. सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे बंधन होते. मात्र संकेतस्थळाच्या धीम्या गतीने इच्छुक उमेदवार त्रस्त होते. त्यांना अर्ज भरताना अडचणी येत होत्या. निवडणूक विभागाने शेवटी ऑफलाइन अर्ज घेण्याचा निर्णय घेतला शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली. शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत काही तालुक्यांत अर्ज स्वीकृती सुरू होती. आकडेवारी यायला रात्रीचे १२ वाजले.
दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अखेरच्या दिवशी एकूण १३ हजार ४८८ अर्ज दाखल झाले. यामध्ये सरपंचपदासाठीचे २ हजार २१८ तर, सदस्यपदासाठी ११ हजार २७० अर्ज दाखल झाले आहे.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात एकूण २४ हजार ०७७ अर्ज आले असून यात सरपंचदाचे ४ हजार २१६ तर, सदस्यपदाचे १९ हजार ८६१ अर्ज आहेत. एकूण अर्जांच्या ५६ टक्के अर्ज हे शुक्रवारी एकाच दिवसांत दाखल झाले आहेत.
बुधवारी होईल चित्र स्पष्ट
दरम्यान, सोमवारी (५ डिसेंबर) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा ७ डिसेंंबर हा अखेरचा दिवस आहे. त्याच दिवशी चिन्हवाटपही होईल. त्यामुळे आता २४ हजार अर्ज दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात किती उमेदवार रिंगणात टिकून राहतात हे चित्र बुधवारी स्पष्ट होणार आहे.
२७% वाढले अर्ज
दरम्यान, सन २०१७ मध्ये ७०४ ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्यांसाठीचे मिळून सुमारे १९ हजार अर्ज दाखल झाले होते. पाच वर्षांनी ही संख्या आता २७ टक्क्यांनी वाढली असून सन २०२२ मध्ये २४ हजार ७७ अर्ज दाखल झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.