आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:304 दिवसांत जिल्ह्यात 546 अपघात; 553 जणांचा मृत्यू, 377 जण जखमी

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक नियमांचे उल्लंघन, अतिवेग आणि बेशिस्तवृत्ती यामुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या ३०४ दिवसांच्या काळात जिल्ह्यात ५४६ अपघातांची नोंद झाली आहे यामध्ये, ५५३ जणांचा मृत्यू झाला आहे तर, ३७७ जण जखमी झाले आहेत.

मागील काही दिवसांत जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यात मोठा अपघात झाला तर, गुरुवारी केज तालुक्यात अपघातात चिमुकला ठार झाला. रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूला केवळ वाहनांची वाढती संख्या जबाबदार नाही तर, अकुशल चालक, अपात्र वाहने आणि रस्त्याची सदोष रचनाही जबाबदार आहे. या कारणांमुळे जिल्ह्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन चालकांमध्ये वाहनाचे पूर्ण ज्ञान नसणे, वाहतूक नियमांची अपुरी माहिती यामुळेही अपघात होत आहेत. काही रस्त्यांवर फलक, बॅरिकेडस् रबलिंग स्ट्रिप चाही वापर आवश्यक आहे. विशेषत: धुळे- सोलापूर महामार्ग, धारूर घाट, माजलगाव, परळी, अंबाजोगाई-लातूर मार्ग आणि आष्टी तालुक्यात अपघातांची संख्या अधिक आहे.

नैसर्गिक कारणांमुळेही होत आहेत अपघात
धुके किंवा मुसळधार पाऊस, उष्णतेमुळे टायर फुटणे, रस्त्यावर अचानक जनावर वाहनाला आडवे येणे, दरड कोसळणे अशा नैसर्गिक कारणांमुळे ही अपघात होतात मात्र याचे प्रमाण अतिशय कमी असून अधिक अपघात हे मानवी चुकीमुळे होतात.
महामार्गांवर ५७ अपघात
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ आणि राष्ट्रीय महामार्ग ६१ जातो. या दोन महामार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर या काळात एकूण ५७ अपघात झाले. महामार्ग क्रमांक ५२ वर ३० अपघातात ३४ जणांचा मृत्यू झाला तर, महामार्ग क्रमांक ६१ वर २७ अपघातात ५१ जणांचा मृत्यू झाला.

आरटीओंकडून तपासणी आणि कारवाई हवी
बीड शहरातील आरटीओ कार्यालयाकडून वाहन तपासणी आवश्यक आहे. मात्र, आरटीओ कार्यालयाचे याकडे दूर्लक्ष दिसून येत आहे. अनेक अपात्र वाहने रस्त्यांवर सुसाट धावत आहेत, परवान्या शिवाय चालक वाहने चालवित आहेत. वाहतूक पोलिस शहरात कारवाई करतात मात्र शहराबाहेर तपासणी आवश्यक असताना दुर्लक्ष केले जाते.

जिल्ह्यातील अपघातांची मानवी कारणे अशी...
अतिवेगाची नशा, धोकादायक ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, मद्यपान करुन वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन नेणे, क्षमतेपेक्षा व परवानगीपेक्षा अधिक प्रवासी वाहनात बसवणे, वाहन चालवण्याचे प्रशिक्षण न घेणे, वाहतूक नियमांची अपुरी माहिती, हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणे, रस्त्यावर वाहन उभे करणे यामुळे अपघात होतात.

बातम्या आणखी आहेत...