आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख १४ हजार ५२९ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी १३ जून रोजी दोन गणवेश मिळणार आहेत. यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने जिल्ह्यातील शालेय व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर ६ कोटी ८७ लाख १७ हजार ४०० रुपयांचा निधी जमा केला. एक गणवेश शिवायचा म्हटले तर किमान एक हजार रुपये लागतात. त्यामुळे ६०० रुपयांची मंजूर केलेली रक्कम तुटपुंजी असल्याचा सूर उमटत आहे.
चार वर्षांपूर्वी राज्य शासनाने गणवेशासाठी थेट लाभ हस्तांतर प्रणालीतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी सहाशे रुपये जमा केले होते. पंरतु, विद्यार्थ्यांना गणवेशासाठी बँक खाते काढण्यासाठी पाचशे रुपयांचा खर्च येत होता. शिवाय, ग्रामीण भागात बँकांचा अभाव, आयएफसी कोड चुकण्याचे प्रकार यामुळे पैसे मिळणे मुश्कील झाले होते. शासनाने थेट लाभ हस्तांतराची योजना गुंडाळत ४ जून २०१९ मध्ये दुसरा निर्णय घेत थेट जिल्ह्यातील शालेय व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता शालेय समिती विद्यार्थ्यांना २ गणवेश देणार आहे. विद्यार्थ्यांना गणेवश देताना तो एकसारखा व ठरावीक असावा. शालेय व्यवस्थापन समितीशिवाय केंद्र, तालुका व जिल्हास्तरावरून गणवेश पुरवण्याचा निर्णय घेऊ नये, असे नव्या निर्णयात म्हटले आहे. जिल्ह्यातील शालेय समितीच्या बँक खात्यावर यंदाच्या गणवेशाचे एकूण ६ कोटी ८७ लाख १७ हजार ४०० रुपये वर्ग केले आहेत.
पहिली वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करावा लागणार आहे. सन २०२२-२३ मध्ये भारत सरकाराच्या प्रकल्प मान्यता मंडळाने सन २०२०-२१ च्या यूडायसमधील उपलब्ध माहितीनुसार विद्यार्थी संख्या निश्चित करून आर्थिक तरतूद केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रतिविद्यार्थी सहाशे रुपये अशी आर्थिक तरतूद केली आहे.
मागील वर्षी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी तीनशे रुपयांप्रमाणे केले होते जमा
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे जिल्ह्यातील १ लाख १४ हजार ६५५ विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी तीनशे रुपयांप्रमाणे एकूण ३ कोटी ४३ लाख ९६ हजार रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे शालेय व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर जमा केले होते. एकच गणवेश देण्यात आला हाेता.
-तुकाराम पवार, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान.
शालेय शिक्षण समितीला काय दिलेत आदेश
जिल्ह्यात येत्या १३ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होताहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके अन् गणवेश देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शालेय शिक्षण समितीला दिलेत. त्यामुळे दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर शाळा गजबजणार आहेत.
यापूर्वी कधी मिळाला होता गणवेश
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी २०१७-१८ मध्ये एमपीएसडीकडून उशिरा निधी मिळाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणेवश वाटप करताना चक्क १५ ऑगस्टचा दिवस उजाडला होता. गणवेशाचे पैसे आल्यावर जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाकडून आठ दिवसांत निधी वर्ग होत होता. परंतु, विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळत नव्हता. यंदापासून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.