आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीची मागणी:माजलगाव पालिकेत ६० कोटींचा घोटाळा; राऊतांची सीएमकडे तक्रार​​​​​​​

माजलगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात येथील नगरपालिकेत स्वच्छता अभियंता जगदीश जाधवर, बांधकाम अभियंता व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी साठ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी केला आहे. स्वच्छता निरीक्षक व भांडारपाल यांचा अहवाल न घेता बोगस बिले काढल्याची तक्रार करत त्यांनी संबंधिताविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

नगराध्यक्ष अपात्रतेच्या प्रकरणानंतर आता भाजप तालुकाध्यक्षांच्या तक्रारीने नव्या वादाला तोंड फुटलेे. राऊतांनी प्रशासनामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, शहरात अनेक महिन्यांपासून छोटी-मोठी बिले काढून सफाई व पाणीपुरवठा अधिकारी जगदीश जाधवर यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. जाधवर व मुख्याधिकारी विशाल भोसले हे ठेकेदारांकडून कामे करून घेण्याबरोबरच त्याच कामाचे स्वतंत्र बिल दुसऱ्यांदा काढून घेतात. घनकचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंडकरिता केसापुरी वसाहत येथे जागा असताना सिंदफणा नदीपात्रात हा कचरा टाकला जातो. तसेच डम्पिंग ग्राउंडमध्ये एकदा रस्ते झालेले असतानाही दुसऱ्यांदा रस्ते बांधकाम दाखवून पैसे उचलल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. पाणीपुरवठा लिकेज व खरेदी तसेच नियमाने पाणीपुरवठा व्हॉल्व्ह व साहित्य खरेदीची प्रक्रिया भांडारपालने करायची असताना जाधवर हे खरेदी करतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून चौदा किमीपेक्षा जास्त पाइपलाइन झालेली असतानाही नगर परिषदेत तेच काम दाखवून त्याची बिले उचलली जातात. नगर पालिकेने २७४ छोटे-मोठे रस्ते २४ कोटींच्या निधीतून बांधून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसे वर्ग केले होते. परंतु, त्याच रस्त्यावर फक्त नावे बदलून पुन्हा पालिकेकडून कामे दाखवल्याची तक्रार केली.

नव्याने ऑडिट करावे : १७ मार्च २०२२ ला पाच वर्षांचे विशेष ऑडिट लावले होते. परंतु, आमदार प्रकाश सोळंकेंच्या सांगण्यावरून हे ऑडिट रद्द केले. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून घोटाळ्यात असणाऱ्यांना निलंबित करावे व नवीन अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडे केली.

एवढा निधी आलाच नाही, तर भ्रष्टाचार कसा ?
माजलगाव नगर परिषदेला २ वर्षांच्या काळात एवढा निधी आलेलाच नाही, तर त्यात भ्रष्टाचार कुठून होईल? संबंधित व्यक्तीने केलेले आरोप अतिशय चुकीचे असून त्यात कुठलेही तथ्य नाही.
विशाल भोसले, सीओ, नगर परिषद, माजलगाव.

बातम्या आणखी आहेत...