आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने रविवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा येथील गावठी हातभट्टीवर छापा मारला. यावेळी ५ जणांना ताब्यात घेत पोलिसांनी १ लाख ८५ हजार रुपयांची ६०० लिटर दारू आणि रसायन नष्ट केले. होळी व धूलिवंदनाच्या दिवशी मद्य सेवनातून अनेक गैरप्रकार घडतात. गैरकृत्यांना आला घालण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी त्यांच्या विशेष पथकाला बेकायदेशीर दारूभट्ट्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, राडी तांडा येथे काही व्यक्ती त्यांच्या घरासमोर बसून बेकायदेशीररीत्या हातभट्टी तयार करत असल्याची माहिती पथक प्रमुख एपीआय रवींद्र शिंदे यांना मिळाली होती.
त्यांनी छापा मारून रोहिदास किसन आडे, सुंदर रामचंद्र आडे, आकाश विश्वनाथ आडे, गजानन सुभाष आडे आणि सचिन सुंदर आडे या पाच जणांना गावठी हातभट्टीची दारू तयार करताना आणि विक्री करताना रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन आणि तयार दारू असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवर नष्ट केला. याप्रकरणी देवानंद देवकते यांच्या तक्रारीवरून पाचही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. कारवाई अपर अधीक्षक नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिंदे, पीएसआय शिंगाडे, पोलिस कर्मचारी राठोड, तानाजी तागड, बासर, गायकवाड व आरसीपीच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.