आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापशुसंवर्धन विभागाकडून मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येते. पाटोदा तालुक्यात ७० हजार पशुधनाची नोंद असून अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यातील पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाचा अभाव असल्याने मान्सूनपूर्व लसीकरण करण्याचे आव्हान विभागासमोर आहे.
पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात यात, प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या अशा आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजारांपासून पशुधन दूर रहावे यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबवण्यात येत असते. पाटोदा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात एकूण १२ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये श्रेणी १ मधील पाटोदा, वहाली, वाघिरा, तांबाराजुरी व डोंगरकिन्ही असे पाच तर श्रेणी दोनमध्ये पारनेर, वाघीर, दासखेड, कुसळंब, वैद्यकिन्ही, निरगुडी, थेरला असे सात दवाखाने आहेत.
यापैकी पाटोदा, डोंगरकिन्ही,वहाली व वाघिरा येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पाटोद्यात सध्या पं.स.चे पशुधन विस्तार अधिकारी हे एक अतिरिक्त प्रभारी डॉक्टर कामकाज म्हणून हाकतात. तर सहायक पशुधन विकास अधिकारी ४, पशुधन पर्यवेक्षक ५, व्रणोपचारक ६, परिचर ७ अशी पदे असून पैकी वहाली येथे पशुधन पर्यवेक्षकाचे १ तर वाघिरा व तांबाराजुरीचे व्रणोपचारकचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. पिंपळवंडी व दासखेड येथील पदेही रिक्त आहेत.
असे आहे तालुक्यातील पशुधन
२०१९ च्या २० व्या पशुगणनेनुसार पाटोदा तालुक्यात एकूण गायी व म्हैस, बैल मिळून (लहान मोठी जनावरे) ५४ हजार तर शेळ्या-मेंढ्या २७ हजार एवढे पशुधन असून तालुक्यातून दररोज सरासरी ४५ ते ५० हजार लिटर एवढे दुधाचे संकलन होते.
जनावरांना हे होऊ शकतात आजार
जनावरांच्या आजारात जीवाणूजन्य व विषाणूजन्य अशा दोन प्रकारचे आजार आहेत. त्यात प्रामुख्याने फऱ्या, घटसर्प, लाळखुरकुद आदी आजार आहेत, तर शेळ्यांमध्ये अंत्रविषार व मावा, कोंबड्यांमध्ये मानमोडी, देवी असे आजार आढळतात. या आजारांवरील लसी उपलब्ध झाल्यात. पशुमालकांनी आपापल्या उपकेंद्राच्या ठिकाणी पशुधनाचे लसीकरण करावे, असे आवाहन प्र. पशुधन विकास अधिकारी डॉ. बळीराम राख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.