आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माजलगावात राजे शिवाजी गणेश मंडळाच्या शिबिरात 71 जणांचे रक्तदान

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंडळ स्थापनेपासून सामाजिक उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवत माजलगाव येथील राजे शिवाजी गणेश मंडळाने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. मागील सहा वर्षांपासून हे गणेश मंडळ वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम राबवत असून देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक जागृती करत आहे.

गणेशोत्सवातील सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवत आणि शहरातील नागरिकांना एकत्र आणत विविध विषयांवर जागृती करण्यासाठी स्व. दिलीपराव सोळंके यांनी सन २००० मध्ये माजलगावात राजे शिवाजी गणेश मंडळाची स्थापना केली. यामध्ये स्व. विलास घोडके यांनीही मोलाचे सहकार्य केले. गणेशोत्सवाची ही परंपरा सुरेश शेटे, ज्ञानेश्वर मेखे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मदन पांढरे, उपाध्यक्ष भानुदास सोळंके, सचिव नितीन चोरगडे, किसन शिंदे, कोषाध्यक्ष अविनाश सोळंके, विकास पाटील, दशरथ चोरगडे, स्पर्धा प्रमुख महादेव सिरसट यांच्यासह मंडळाचे दीडशे सदस्य पुढे घेऊन जात आहेत.

गेल्या काही वर्षांत या मंडळाने पर्यावरणविषयक उपक्रमांवर विशेष भर देण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिकमुक्ती, प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता या विषयांवर पथनाट्याद्वारे हे मंडळ जनजागृती करत आहे. या मंडळाकडून वृक्षारोपणालाही विशेष महत्त्व दिले जात आहे. या वर्षी रक्तदान व वृक्षारोपण असे दोन्ही उपक्रम राबवण्यात आले. मंगळवारी (६ सप्टेंबर) राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७१ दात्यांनी उत्साहाने रक्तदान केले. मंडळाच्या वतीने दरवर्षी महिलांना आरतीचा विशेष मान दिला जातो. यंदाही ५१ महिलांच्या हस्ते गणरायाची आरती करत ही परंपरा जपली आहे.

यंदा भगवान महादेवाचा देखावा ठरणार आकर्षण दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी राजे शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने मिरवणुकीदरम्यान देखावे सादर केले जातात. यामध्ये गेल्या वर्षी विदूषकांचा देखावा सादर केला होता. यासह मंडळाचे टिपरी नृत्यही लक्ष वेधणारे असते. यंदा विसर्जन मिरवणुकीत भगवान महादेवाचा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मदन पांढरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...