आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन:स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त 75 स्वातंत्र्य सैनिक 75 झेंडे खांद्यावर घेऊन करणार आझाद मैदानावर निषेध धरणे

रवी उबाळे | बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या अमृत महोत्सवामध्ये "आम्ही पारतंत्र्यात जिंकलो मात्र स्वातंत्र्यात हरलो" अशा संतापजनक शब्दांमध्ये भावना व्यक्त करत स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे बेमुदत आंदोलन 17 सप्टेंबर 2022 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर केले जाणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे राज्य सचिव आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. बीड शहरांमधील स्वातंत्र्य सैनिक भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी राज्याध्यक्ष भाऊसाहेब सोळंके, उपाध्यक्ष जवाहरलाल सारडा, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयापर्यंत पायी जाणार

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 स्वातंत्र्य सैनिक 75 झेंडे खांद्यावर घेऊन मुंबई येथील हुतात्मा चौक ते मंत्रालयपर्यंत पायी चालत राष्ट्रघोष करणार आहेत तसेच मंत्रालयातील तिरंग्याला मानवंदना देऊन रांगेमध्ये उभे राहून राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे.‌ त्यानंतर "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम" या दोन घोषणा देऊन शांततामय वातावरणात पुन्हा आंदोलन सर्व 75 स्वातंत्र्य सैनिक रवाना होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत अशाच पद्धतीने दैनंदिन आंदोलन केले जाईल. या बेमुदत आंदोलनाची राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन प्रश्न निकाली काढावा, असा इशारा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे राज्य सचिव आप्पासाहेब शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या आहेत मागण्या

इतर राज्यांप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रथम वारसदारांस ओळखपत्र देण्यात यावे. स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यांच्या नियुक्ती संबंधी असलेला शासन निर्णय दि . 4 मार्च 1991 च्या निर्णयाची प्रभावी अंमजबजावणी करावी. ज्या उद्देशाने ( शासकीय नोकरीकरीता ) नामनिर्देशन पत्र करण्यात येते. तो उद्देश पूर्ण होईपर्यंत नामनिर्देशन पत्र रद्द समजण्यात येऊ नये. स्वातंत्र्य सैनिक हयात असताना नोकरीसाठी करुन दिलेले नामनिर्देशन पत्र स्वातंत्र्य सैनिक मृत्यू पावल्यानंतर रद्द बाबत असलेला दि. 28 फेब्रुवारी 2014 चा अन्यायकारक व चुकीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा.

सन्मानित करण्याची मागणी

इतर राज्यांप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकाच्या मानधनामध्ये वाढ करावी . स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना इतर राज्यांप्रमाणे 10 टक्के समांतर आरक्षण देण्यात यावे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर शासनामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक व विधवा पत्नी यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देवून योग्य तो सन्मान पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात यावा. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास भेट योजना म्हणून हयात स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या वारस पत्नी यांनी पूर्वी भूखंडाचा लाभ घेतला नाही, अशाना गृहनिर्माण सोसायटीसाठी निवासी भूखंड शहरालगत देण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्यात यावेत यासह इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...