आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोराेनामुळे शाळकरी मुलांना घरी राहावे लागले. या काळात मुलांनी अभ्यासासह वेळेचा सदुपयोग करत अनेक कला आत्मसात केल्या. बीड येथील उत्कर्षा गंधे हिने वाचनाचा छंद जोपासला. वाचनातून मिळालेल्या प्रेरणेतूनच तिने डिसेंबर महिन्यात लिखाणालाही सुरुवात केली. अवघ्या सहा दिवसांत तिने शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांचा प्रवास उलगडणारे ‘सिंगिंग द अनसंग : ए जर्नी ऑफ लाइफटाइम इल्युमिनेशन’ हे पुस्तकही लिहिले. विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजी अॅमेझॉनवर हे पुस्तक प्रकाशित झाले असून पाच दिवसांत १३ जणांनी हे पुस्तक खरेदी केले असून पाच जणांनी ५ स्टारचे मानांकन दिले आहे.
बीड येथील चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकवणारी उत्कर्षा अरविंद गंधे. लॉकडाऊनमुळे गेली आठ नऊ महिने घरूनच अभ्यास सुरू होता. या काळात फावल्या वेळेत उत्कर्षाला अवांतर वाचनाला मोठा वेळ मिळाला. आवडीच्या लेखकांची पुस्तके, आत्मचरित्रे तिने वाचून काढली. यातूनच आपणही पुस्तक लिहावे असे तिला वाटू लागले. एरवी निबंध, कवितांतून व्यक्त होणाऱ्या उत्कर्षाला शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांचा प्रवास कसा झाला, आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटते, यासह विद्यार्थ्यांची त्यांच्याबद्दल काय भावना आहे, हे सर्व शब्दबद्ध करण्याची कल्पना सुचली. त्यातूनच तिने डिसेंबर महिन्यात लिखाणाला सुरुवात केली. अवघ्या सहा दिवसांतच तिने १७२ पानांचे हे पुस्तक लिहून पूर्ण केले. तिला या कामी मैत्रीण अदिती राहुल सानप हिनेही मदत केली. या दोघींनीही शिक्षक म्हणून काम करताना अरविंद गंधे हे कशा पद्धतीने मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करतात, हे स्वानुभवातून अतिशय ओघवत्या भाषेत पुस्तकात नमूद केले आहे. दरम्यान, अॅमेझॉन किंडलवर २७ जानेवारी रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले असून या लिखाणाने अनोखा आनंद मिळाल्याची भावना उत्कर्षा व अदिती यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकाबद्दल लिहिताना मोठा कस लागला. शिक्षक हे खऱ्या अर्थाने विद्यार्थी रूपातील चिखलाला घडवून त्याचे मोल वाढवतात, अशी भावना अदिती सानपने व्यक्त केली. हे पुस्तक लिहिण्यासाठी उत्कर्षाला केदारनाथ खिस्ते, डॉ.अनुराधा देवकत्ते, डॉ.प्रसन्न लोध, प्रथमेश देशपांडे, देवकर यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न
पालक व शिक्षक हे मुलांना घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. माझे बाबा हे शिक्षक व पालक या दोन्ही रूपांनी मला आदर्श वाटतात. त्यामुळे त्यांच्याप्रति भावना व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक लिहिले. अमेझॉनने ते प्रकाशित केल्याने मोठा अानंद वाटतोय.’ - उत्कर्षा गंधे, विद्यार्थिनी,
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.