आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघे दोनशे उंबरे असलेल्या गेवराई तालुक्यातील बऱ्हाणपूरकरांनी धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडावरील आपली श्रद्धा विकासाच्या देणगीच्या माध्यमातून दाखवून दिली. ग्रामस्थांनी वर्गणी करुन तब्बल ३१ लाख रुपयांची देणगी श्री क्षेत्र नारायणगडाचे पीठाधिपती शिवाजी महाराज यांच्याकडे दिली. श्री क्षेत्र नारायण गडाची महती अवघी राज्यभर आहे. भव्य सभामंडप, भक्त निवास उभारले आहे. गडावर शेकडो गाईचा सांभाळ केला जातो. गडाच्या शेतीचाही विकास मोठ्या प्रमाणावर झाला असून उत्पन्नातही वाढ झाली आहे.
गडाच्या माध्यमातून धार्मिक उपक्रमांसह आरोग्य, शिक्षण, सामाजिक आदी विविध क्षेत्रांत काम करण्यावर मठाधिपती शिवाजी महाराज यांचा भर असतो. गडावर नित्यानेच राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. आषाढी व कार्तिकी एकादशी तसेच इतर मोठ्या कार्यक्रमांना गडावर येणाऱ्या भाविकांचा आकडा लाखांच्या घरात असतो. दरम्यान, गडाच्या विकासासाठी भाविक आपापल्या परीने मदत करत आहेत. जिल्ह्यात व विशेषत: बीड, गेवराई व शिरूर कासार तालुक्यात गडाचे नि:स्सिम भक्त आहेत. गडावरील भक्तीचा प्रत्यय रविवारी आला.
गावातील वार्षिक हरिनाम सप्ताहाचे किर्तन श्रीक्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचे होते. रविवारी किर्तन झाल्यानंतर गावकरी भक्तांनी जमविलेल्या ३१ लाख रुपयांची देणगी रक्कम महाराजांना सुपूर्द करुन आपली गडावरील श्रद्धा दाखवून दिली. शिवाजी महाराज म्हणाले, नगद नारायण महाराजांच्या कृपेने बऱ्हाणपूर वासियांना काही कमी पडणार नाही. गडावर भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.