आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:तोतया पोलिस निरीक्षकाने शेतकऱ्यास दोन लाख चाळीस हजारांस लुटले

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्याचा एका तोतया पोलिस निरीक्षकाने तीन अंगठ्या व सोन्याची चैन असा २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज हातचलाखी करत लांबवल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील वकीलवाडी भागातील शेतकरी महादेव शाहू चौरे (६५) हे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता स्कूटीवरून (एमएच ४४ आर ७४८८) कळंब रस्त्यावरील शेतात कुत्र्यास भाकरी घेऊन निघाले होते. या रस्त्यावरील चित्रपटगृहासमोर गेले असता दुचाकीवरून आलेल्या व डोक्यास हेल्मेट असलेल्या व्यक्तीने त्यांना थांबवून मी पोलिस इन्स्पेक्टर असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखविले. त्याने तुम्हाला तुकाराम शिंदेला लुटल्याचे माहिती नाही का, तुम्ही एवढे सोने घालून का फिरतात असे म्हणत गळ्यातील सहा तोळ्यांची सोन्याची चेन व हातातील तीन अंगठ्या काढायला लावून रुमालात ठेवल्या. तो रुमाल स्कूटीच्या डिकीत ठेवून घरी ठेवून या असे सांगितले. त्यामुळे महादेव चौरे हे घराकडे निघाले.

मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी स्कूटी थांबवून डिकी उघडून रुमालात अंगठ्या व चेन आहेत का याची खातरजमा केली असता त्यांना अंगठ्या व सोन्याची चेन गायब दिसली. तोतया पोलिस निरीक्षकाने हातचलाखी करीत तीन अंगठ्या व ६ तोळ्यांची सोन्याची चेन असा २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. महादेव चौरे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध केज पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...