आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:निसर्गकन्येचा विवाह; आपट्याच्या पानांचे मंगळसूत्र, वडाभोवती फेरे

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तागडगावातील सर्पराज्ञी प्रकल्पात पार पडला रविना-अरविंदचा विवाह सोहळा

पक्ष्यांचा किलबिलाट, मावळतीच्या सूर्याची साक्ष, आराध्य वृक्ष व इतर प्रकारची झाडांची उपस्थिती अशा निसर्गसंपन्न वातावरणात, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र परिसरात रविवारी (ता. २१ मार्च) रविना सवाई व अरविंद महाकुडे यांचा विवाह सोहळा पार पडला. जागतिक वन दिनाचे औचित्य साधुन बीड येथील रविना रवी सवाई व अरविंद शिवराम महाकुडे यांनी रेशीमगाठी जुळवण्याचे ठरवले होते. त्यानुसार तागडगाव (ता.शिरूर) येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रातील गंगाई नक्षत्रवनात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अनोखा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी मोजकेचं आप्तेष्ट हजर होते. मात्र, त्याहीपेक्षा जास्त संख्येने उपस्थिती होती ती झाडांची, रोपांची. सायंकाळी पाच वाजता लग्नघटिका जवळ आली होती. तत्पूर्वी रविनाने सर्पराज्ञीत असताना वाचवलेला करकोचा मुक्त करण्यात आला.

त्यानंतर साडेपाच वाजता वधु रविना व वर अरविंद यांच्या हस्ते वड व पिंपळाची लागवड करण्यात आली. त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी गंगाई नक्षत्रवनात लावलेल्या वडाच्या फेऱ्या घेऊन विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या विवाह साहेळ्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांना एक कापडी पिशवी भेट देण्यात आली. त्यात पन्नास बिया देण्यात आल्या. या बियांची लागवड करत निसर्गाला जपण्याचा संकल्प करावा, असे आवाहन नवदांपत्याने सर्वांना केले. सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाचे संचालक सिध्दार्थ साेनवणे, सृष्टी सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनी कोविड नियमावलीचे पालन करत विवाह सोहळ्यास हजेरी लावली.

जागतिक वन दिनाचे औचित्य साधून बीड येथील रविना रवी सवाई व अरविंद शिवराम महाकुडे यांनी तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पात साता जन्माच्या गाठी बांधल्या. वृक्षारोपण करून झाडांना पाणी घालत हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.

बातम्या आणखी आहेत...