आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेवरही होईल परिणाम:आगामी निवडणुकांसाठी नेत्यांना अलर्ट करणारा निकाल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना अनेक ठिकाणी मिळालेले धक्के, युवकांचा गाव पातळीवरील राजकारणात झालेला प्रभावी प्रवेश आणि राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपात रंगलेला सामना हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पालिका आणि दोन वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीत नेत्यांना सतर्कतेचा अलर्ट देणारा आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान मुदत संपणाऱ्या ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पहिल्यांदाच गावगाड्याच्या या निवडणुका होत होत्या. त्यामुळे गावांवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी लढाई पहायला मिळाली. सुरुवातीला ऑनलाइन अर्जांमध्ये वेळ गेल्यानंतर अखेरच्या दिवशी अर्ध्याहून अधिक अर्ज दाखल केले गेले. निवडणुकांची प्रक्रिया सुरु होताच पहिल्या टप्प्यात ४७ सरपंच आणि ६६२ सदस्य बिनविरोध निवडूण देत अनेक गावांनी एकी दाखवली होती. तर, नंतरच्या काळात अवघ्या दहा दिवसांत रात्रीचा दिवस करुन उमेदवारांनी प्रचार केला होता. पहिल्यांदाच निवडणुकीसाठी आमदार, माजी अामदार हे थेट गावात जाऊन प्रचार करताना दिसून आले.

मंगळवारी झालेल्या मतमोजणीत नेत्यांनी आपापले गड राखल्याचे दिसून आले. यात, गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भाजपचे लक्ष्मण पवार सलग दुसऱ्यांदा आमदार असतानाही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवून दाखवत ग्रामीण भागावर अद्यापही पकड मजबूतीचे अधोरेखित केले. त्यामुळे आमदार पवार यांना आगामी निवडणुकांत ग्रामीण मतांचा विचार करावा लागणार आहे.

परळी मतदार संघात माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. पहिल्या निकालापासूनच त्यांनी आघाडी घेतली होती. मंत्रीपदाचा उपयोग करुन ग्रामीण भागात केलेल्या कामाची ही पावती होती. मात्र, पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपनेही इथे लढत देण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत मतदार संघावरची पंकजांची पकड कमी असल्याचे अधाेरेखीत झाले. त्यामुळे, गत विधानसभेला पराभव पाहिलेल्या पंकजांना पुढील विधानसभेसाठी आतापासून तयारी करावी लगाणार आहे.

यंत्रणेचा लागला कस
७०४ म्हणजे निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणुक एकाच वेळी होत असल्याने या सर्व प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणेचा मोठा कस लागला. विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंत्रणेला काम करावे लागले. १५ हजार कर्मचारी प्रक्रियेत होते.

लिंबागणेश, केकतपांगरीचा डाग
सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली असताना गेवराईच्या केकतपांगरीत पोलिसांवर झालेली दगडफेक आणि लिंबागणेशमध्ये मतदान यंत्रणावर स्टफ बाँड टाकल्याचा प्रकार घडल्याने प्रक्रियेला मोठा डाग लागला.

बातम्या आणखी आहेत...