आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:आवसगावात शॉर्टसर्किटने 7 एकर ऊस जळाला; 5 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

केज2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शेतातून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीवर शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत आवसगाव (ता. केज) येथील पाच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ७ एकरातील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बनसारोळा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राची मुख्य विद्युत वाहिनी आवसगाव गावापासून गेलेली आहे. रविवारी दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उसाच्या पाचटावर पडल्याने आग लागली. वारे आणि कडक उन्हामुळे आगीने काही वेळात राैद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आल्याने आणखी मोठा अनर्थ टळला. परंतु, तोपर्यंत शेतकरी सुनील अमृत शिनगारे, संतोष भारत शिनगारे, मदन विठ्ठल शिनगारे, बन्सी गुंडिबा शिनगारे, बळीराम गणपती शिनगारे या पाच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ७ एकर ऊस जळला, त्यांचे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज महावितरण कंपनीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांनी आता तरी ऊस लवकर घेऊन जावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
मांजरा धरणाच्या ग्रीन बेल्टमध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक शेतकऱ्यांचा ऊस उभाच आहे. अशा परिस्थितीत ऊस जळण्याच्या घटना वाढल्याने ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...