आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील पारगाव (जोगेश्वरी) येथे रविवारी सकाळी बिबट्याने ६१ वर्षीय वृद्धेवर हल्ला केला. मात्र, वृद्धेसोबत असलेल्या पुतण्याने धैर्याने काठीने सामना केल्याने वृद्धेचे प्राण वाचले. सायंकाळी आणखी एका महिलेवर हल्ला करून तिचे प्राण घेतले. सहा दिवसांत गेलेला हा तिसरा बळी आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील सुर्डी, पारगाव, मंगरूळ हा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे. रविवारी सायंकाळी सुरेखा निळकंठ बळे (५५) या पारागावातील शेतात असताना बिबट्याने हल्ला केला. त्या कापूस वेचणीसाठी शेतात होत्या. एकट्या असल्याने त्या बिबट्याचा प्रतिकार करू शकल्या नाहीत. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, सकाळी शालन भोसले (६१ रा. पारगाव जोगेश्वरी) या पुतण्या विजय व सून यांच्यासह शेतातून घरी घेऊन जात असताना शेतालगतच बिबट्याने हल्ला केला. त्यात त्या जखमी झाल्या.
२४ नोव्हेंबरला बिबट्याने सुर्डी येथील नवनाथ गर्जे या शेतकऱ्याचा बळी घेतला होता. २७ नोव्हेंबरला किन्ही येथील १० वर्षीय मुलाला शेतातून आजी आणि काकांसमोर बिबट्याने उचलून नेले होते. अर्ध्या तासाच्या शोधानंतर या मुलाचा मृतदेह सापडला होता. शनिवारी मंगरूळ शिवारात महिला व मुलावर हल्ला केला.
१२५ कर्मचारी, १२ कॅमेऱ्यांनी नजर, तरीही वन विभागाची ‘वणवण’ निष्फळ
वन विभागाच्या पुणे, अमरावती, बीड येथील सुमारे १२५ कर्मचाऱ्यांकडून मागील चार दिवसांपासून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. १२ कॅमेऱ्यांनी हालचालींवर नजर ठेवली जात आहे. मात्र वन विभागाच्या पथकांना हुलकावणी देत बिबट्या माणसांवर हल्ले करत आहे. नरभक्षक बिबट्याला पकडावे किंवा ठार करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी दहशतीखाली - सहा दिवसांत तीन बळी व तीन जण जखमी झाल्याने तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात जाण्यासाठीही नागरिक धजावत नाहीत. शेतवस्तीवर राहणारे शेतकरी अधिक घाबरलेले असून लहान मुलांना घराबाहेरही पडू दिले जात नाही.
वृद्धेला ३०० मीटर फरफटत नेले, पुतण्याच्या हल्ल्याने जीव वाचला
रविवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात शालन भोसले या जखमी झाल्या. त्यांना बिबट्याने २०० ते ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. पुतण्या विजय याने प्रसंगावधान राखून काठीने प्रतिहल्ला चढवल्याने बिबट्याने पळ काढला. बिबट्याच्या या हल्ल्यात शालन गंभीर जखमी झाल्या आहेत. उपचारासाठी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केेले. त्यांच्या चेहऱ्यावर व मानेवर गंभीर जखमा झाल्या असून बिबट्याची नखे व दात लागले आहेत. सात टाके त्यांच्या मानेला घ्यावे लागले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.