आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंतित:तवलवाडीत घटसर्प आजाराचा उद्रेक; चार दिवसांत शंभर जनावरे दगावली; मृत जनावरांमुळे धोका

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात पशुधनाचे 80 लाखांचे नुकसान
  • पशुवैद्यकीय विभागाची धांदल, घटना समोर आल्यानंतर गावात ठाण

तालुक्यातील तवलवाडी गावात मागील काही दिवसांत जनावरांना होणाऱ्या घटसर्प आजाराचा उद्रेक झाला आहे. चार दिवसांत गावात तब्बल १०० जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यामध्ये ६० संकरित गायी तर ४० वासरांचा समावेश आहे. अचानक या आजाराचा उद्रेक झाल्याने पशुवैद्यकीय विभागही गोंधळात पडला. ऐन कोरोनाच्या काळात तवलवाडीच्या शेतकऱ्यांचे तब्बल ८० लाख रुपयांचे पशुधन मृत्युमुखी पडून मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय अनेकांनी पसंत केला आहे.

शेतकऱ्याकडे गायी असून रोज जवळपास पाच हजार लिटर दूध संकलन या गावात केले जाते. आता एकीकडे दुधाचे भाव घसरल्याने दुग्ध व्यवसाय तोट्यात आहे. शिवाय शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्यामुळे गावातील युवक वर्गाने मुक्त गायगोठा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवून स्वयंपूर्ण होण्यासाठी दूध धंदा अंगीकारला आहे. त्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटसर्प आजाराने गायी दगावल्याची घटना घडल्याने गावातील पशुपालक चिंतित आहेत. मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार घटसर्प असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर बीड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय देशमुख, डॉ. संतोष शामदिरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी यांनी गुरुवारी तवलवाडी गावाला भेट देऊन पाहणी केली.

घटसर्प अाजाराची लक्षणे
घटसर्प आजारात सुरुवातीला गायीला तीन दिवस लाळ्या खुरकूत झाल्यासारखा ताप येतो. ताप आल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी श्वसनाचा त्रास होऊन गाय जमिनीवर कोसळते व काही तासांतच मरण पावते.

आमदार सुरेश धस यांची धाव
तवलवाडीत एकाच वेळी मोठ्या संख्येने गायींचे दगावल्याचे समजताच आमदार धसांनी तत्काळ तवलवाडी गावात जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला, तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

मृत जनावरांची व्यवस्थित विल्हेवाट लावा
घटसर्प आजाराला रोखण्यासाठी आपण आपल्या गायींना स्वच्छ पाणी पाजले पाहिजे, तिची निगा राखली पाहिजे. दगावलेली जनावरे खड्डा खोदून, त्यात मीठ टाकून व्यवस्थित गाडावे; जेणेकरून इतर जनावरांना त्याचा संसर्ग होऊ नये, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील शेतकऱ्यांना केले आहे. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे भेट देऊन शेतकरी, पशुपालक यांच्याशी चर्चा करताना आमदार सुरेश धस व अन्य.

औरंगाबाद येथील प्रयोगशाळेचे पथक दाखल
या घटनेने पशुवैद्यकीय विभागामध्ये खळबळ उडाली असून शुक्रवारी तवलवाडी गावामध्ये औरंगाबाद येथील विभागीय रोग पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहायक आयुक्त डॉक्टर प्रशांत चौधरी, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रोहित धुमाळ, डॉक्टर वानखेडे यांच्या टीमने भेट दिली असून पाहणी केली आहे. तसेच आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश ढेरे यांची टीम दोन दिवसांपासून तवलवाडी गावामध्ये तळ ठोकून आहे.


बातम्या आणखी आहेत...