आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भलिंगनिदान प्रकरण:राज्यात विक्रीच न होणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्या अंगणवाडी सेविकेकडे, याच गोळ्यांचा साठा नगरमध्ये जप्त

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भलिंगनिदान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकेच्या घरात दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या गर्भपाताच्या गोळ्यांची दोन पाकिटे मिळून दहा गोळ्या आढळून आल्या होत्या. दरम्यान, औषध विभागाकडून या गोळ्या कुठून आल्या याचा तपास सुरू केला गेला आहे. धक्कादायक म्हणजे यातील एका कंपनीच्या गोळ्या या महाराष्ट्रात विक्रीच होत नाहीत असे समोर आले आहे. त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकेकडे कशा आल्या हे आश्चर्य आहे तर दुसऱ्या कंपनीच्या बाबतीतही नगर मार्गे या गोळ्या आल्याचा पाेलिसांना संशय आहे.

जिल्ह्यात गर्भलिंगनिदान होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. गर्भलिंगनिदानात महत्त्वाची दुवा असलेली अंगणवाडी सेविका मनीषा सानपच्या घरावरील छाप्यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा गोळ्या आढळून आल्या होत्या. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी औषध विभागाच्या सहायक आयुक्तांना पत्र पाठवून या गोळ्या कोणत्या ठिकाणाहून विकल्या गेल्या आहेत याची माहिती घेऊन तपास करण्यास सांगितले आहे. या पत्रानंतर औषध विभागाने या गोळ्यांची माहिती घेतली आहे. यातील पाच गोळ्या असलेल्या गोळ्यांचे एक पाकीट ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीकडून महाराष्ट्रात गर्भपाताच्या गोळ्यांची विक्रीच होत नसल्याचे समोर आले, तर दुसऱ्या पाकिटातील पाच गोळ्या या ज्या कंपनीच्या आहेत त्यांचाही अवैधपणे पुरवठा झाल्याचा संशय आहे. काही महिन्यांपूर्वी नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त केला गेला होता त्याच कंपनीच्या या गोळ्या असून याबाबत आता कंपन्यांशी पत्रव्यवहार करून बॅच क्रमांक देऊन त्यांच्या खरेदी-विक्रीची माहिती मागवली आहे, असे सहायक आयुक्त आर. एम. बजाज यांनी सांगितले.

अर्धमसला येथे जाऊन अंगणवाडीत नोटीस डकवली
अर्धमसला येथील वस्तीवर अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेली मनीषा सानप हिला जिल्हा परिषदेने शुक्रवारी तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले. याबाबतचे आदेश सीइओ, डेप्युटी सीइअोंनी काढले. बालविकास प्रकल्प अधिकारी उमा कांडे यांनी अर्धमसला येथे जाऊन अंगणवाडीत याबाबतची नोटीस डकवून माहिती दिली.

गेवराईत अंगणवाडी सेविकांची बैठक
गेवराई तालुक्यात गर्भलिंगनिदान होत असल्याचे समोर आल्याने व यात एक अंगणवाडी सेविका अडकल्याने गेवराई तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची बैठक १६ व १७ जून रोजी बोलावली गेली आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी उमा कांडे यांनी दिली.

कंपन्यांना पत्र पाठवले
गर्भपाताच्या जप्त गोळ्यांची माहिती घेतली आहे. या गोळ्या कंपन्यांनी कोणत्या एजन्सीला विकल्या होत्या व एजन्सीकडून कोणत्या औषध विक्रेत्याला विकल्या गेल्या याची माहिती मागवली गेली आहे. एक गोळी महाराष्ट्रात मिळत नाही. त्यामुळे परराज्यातील कनेक्शनही असू शकते. जिल्ह्यातही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
- आर. एम.बजाज, सहायक आयुक्त, औषध प्रशासन, बीड

तडकाफडकी बडतर्फीचे आदेश
^अंगणवाडी सेविकेला अटक झाल्याची माहिती कळताच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. अहवाल प्राप्त होताच अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करण्याचे आदेश काढले. जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
- चंद्रशेखर केकाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., बीड

बातम्या आणखी आहेत...