आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घाला:बीडमध्ये अपघातवार; तीन घटनांत पाच ठार, अपघातात दुचाकीस्वारांनी गमावला जीव

केज/गेवराईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांनी जीव गमावला. यात केज तालुक्यात केज - मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर सारूळ पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेजण ठार झाले. दुसरीकडे गेवराई तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वारांचा जीव गमवावा लागला. ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आदळल्याने त्यांना जीव गमवावा लागला.

केज : वळण घेताना कारची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू
वळण घेणाऱ्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या कारने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर इतर दोघांचा उपचारांसाठी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. मृत तिघेही सारूळ (ता. केज) येथील रहिवासी आहेत. अप्पाराव बापूराव ढाकणे (६५), माजी सैनिक सुंदर नामदेव ढाकणे (५३), बहादूर राजाभाऊ पुरी (४८) अशी मृतांची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला धडकल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. कारमधील एक महिलाही जखमी झाली आहे. हा अपघात केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारूळ पाटीवर मंगळवारी (२२) दुपारी ३ वाजेच्या सुमारास झाला.

सारूळ येथील अप्पाराव, सुंदर, बहादूर हे तिघे दुचाकीवर (एमएच ४४ पी ६६९२) बसून मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंबाळाचा बरड येथून गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी महामार्गावरून सारूळकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळणार तोच केजकडून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अप्पाराव जागीच मृत्युमुखी पडले. इतर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

गेवराई : दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे दगावले
बीडहून गावी परतताना दुचाकीवरील तरुणाला ट्रकने धडक दिली. यात दुचाकी उसाच्या ट्रॉलीवर धडकली व पुन्हा ट्रकखाली सापडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. तर गेवराईहून वडगावकडे जाणारी दुचाकी ट्रॅक्टर ट्राॅलीवर आदळल्याने मिस्त्री कामगार ठार झाला. हा अपघात कॅप्टन पंपाजवळील परवीन जिनिंगसमोर घडला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला.

गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील अतुल प्रल्हाद कदम कृषी विभागातील पोखरा योजनेत कर्मचारी आहे. तो दुचाकीवरून गावी परत येताना रांजणीजवळ भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी महामार्गाच्या बाजूला उभ्या उसाच्या ट्राॅलीवर धडकली व पुन्हा ट्रकखाली सापडली व अतुलचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गढी येथील उड्डाणपुलाजवळ घडला. वडगाव येथील अशोक नामदेव बोर्डे हा मिस्त्री कामगार गेवराईहून वडगावकडे परतत असताना दुचाकी उसाच्या ट्रॅक्टरवर पाठीमागून धडकली. यात तो जागीच ठार झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला.

कारमधील महिला जखमी : दरम्यान, लातूर जिल्ह्यातील टाकळगाव ( ता. रेणापूर ) येथील दोन महिला, दोन मुली, एक मुलगा आणि कार चालक असे पाच जण कारमध्ये बसून कल्याणकडे निघाले होते. कार उलटल्याने कारमधील चालक सोडता इतरांना मुकामार मार लागला. कावेरी विकास गडदे या किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. केज पोलिस ठाण्याचे फौजदार श्रीराम काळे, पो. कॉ. राजू गुंजाळ यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली. अपघातात कार आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...