आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भलिंगनिदानानंतर अवैध गर्भपात:आरोपी परिचारिकेने केली आत्महत्या, बीडमधील घटनेने खळबळ, 5 जणांना अटक

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपात करताना महिलेच्या मृत्यू प्रकरणात आता अनेक खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. गर्भलिंग निदानानंतरच स्त्रीभ्रूण असल्यानेच गर्भपात केला गेला होता. गर्भलिंग निदानासाठी एजंट म्हणून काम करणारी अंगणवाडी कार्यकर्ती, मृत महिलेचा पती, सासरा, भाऊ व गर्भपात करणाऱ्या परिचारिकेवर बुधवारी पहाटे गुन्हा नोंद केला गेला. दरम्यान, गुन्हा नोंद होताच बुधवारी सकाळी परिचारिका सीमा डोंगरे हिने बिंदुसरा प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केली.

सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (३०, रा. बकरवाडी ता. बीड) या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. तिला आधीच्या तीन मुली आहेत. ती चौथ्यांदा गर्भवती होती. पोलिसांना अवैध गर्भपात व गर्भलिंगनिदानाचा संशय होता. त्यांनी सीताबाईंच्या नातेवाइकांची चौकशी केल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्ती मनीषा सानप (रा. अर्धमसला ता. गेवराई) हिच्या गेवराई येथील घरी गर्भलिंगनिदान केल्याचे स्पष्ट झाल्याने तिला अटक केली होती. पोलिसांनी बुधवारी पहाटे गणेश गाडे, सुंदर गाडे (रा. बकरवाडी), नारायण निंबाळकर (रा. सिनगरवाडी ता. माजलगाव), अंगणवाडी कार्यकर्ते मनीषा सानप (अर्धमसला ता. गेवराई) आणि परिचारिका सीमा डोंगरे हिच्या विरोधात सदोष मनुष्यवध, अवैध गर्भपात, पीसीपीएनडीटी अशा कलमांन्वये गुन्हा नोंदवला गेला. या प्रकरणात परिचारिका सीमा डोंगरे हिच्याशिवाय इतर आरोपींना मंगळवारीच ताब्यात घेतले गेले होते. दरम्यान, आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याचे कळताच परिचारिका सीमा डोंगरे हिने बीड शहराजवळील बिंदुसरा प्रकल्पात बुधवारी सकाळी उडी घेऊन आत्महत्या केली.

मुलाला शेवटचा फोन करून घेतली बिंदुसरेत उडी
सीमा हिच्या पतीचे निधन झाले असून तिच्या मुलीनेही काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. बुधवारी सीमा ही पाली येथे बिंदुसरा प्रकल्पावर गेली. तेथून मुलाला फोन करून मला मुलीची आठवण येत असून मी चालले, असे म्हणत फोन ठेवला. त्यानंतर पाण्यात उडी घेतली.

बातम्या आणखी आहेत...