आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:ठाणे प्रमुख बदलताच वाळू माफियांवर कारवाई; चार हायवासह दोन ट्रक, एक केनी घेतले ताब्यात

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभारी सपोनि मारोती मुंडे यांची कारवाई; ठाणे हद्दीतून होणारा वाळू उपसा चव्हाट्यावर

गेवराईत वाळू माफियांनी उच्छाद मांडला असून तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. दरम्यान चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या जागी प्रभारी सपोनि मारोती मुंडे आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी राक्षसभुवन येथे गोदापात्रात धाड टाकून तब्बल चार हायवा व दोन ट्रक, वाळू उपसा करण्याची एक किनी ताब्यात घेतली. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली असून ठाणे प्रमुख बदलताच कारवाई केल्याने या ठाणे हद्दीतून होत असलेला बेसुमार वाळू उपसा चव्हाट्यावर आला आहे.

गेवराईत वाळू माफियांची मोठी साखळी असून रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. मात्र याकडे महसूल विभाग तसेच पोलिस प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष असल्याने वाळू माफिया सर्रास वाळू उपसा करून त्याची वाहतुक करत आहे. त्यातच तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर वाळू माफियांनी उच्छाद मांडलेला आहे. तरी देखील येथील सपोनि विजय देशमुख यांनी एकदाही कारवाई करण्याचे धाडस दाखवले नव्हते. तर हप्तेखोरीची चर्चा मात्र जोरात होती. परिणामी वाळू माफियांचा या ठाणे हद्दीत मुक्त संचार होता. दरम्यान मागील आठवड्यात येथील ठाण्यात अटक असलेल्या दोन कोरोना पाँझिटीव्ह आरोपीमुळे येथील ठाणे प्रमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी असे तब्बल 17 जण कोरोना पाँझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे या ठाण्याचा सध्या सपोनि मारोती मुंडे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. शनिवारी मुंडे यांना राक्षसभुवन येथून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकार्यासह सकाळी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी चार हायवा, दोन ट्रक सह एक किनी ताब्यात घेतले. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे यांच्यासह पोउपनि शेख, पो. कॉ. किशोर खेञे, तुकाराम पवळ, विठठल शिंदे, खताळ, औसरमल, ओव्हळ,पोह उगलमुगले, काकडे, श्रीधर सानप सह आदी कर्मचार्‍यांनी केली असून ठाणे प्रमुख बदलताच वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्याने या ठाणे हद्दीतील वाळू उपसा चव्हाट्यावर आला आहे. देशमुख यांनी दिड वर्षात एकदाही वाळू माफीया विरोधात कारवाई केली नाही. तर मुंडे यांनी पदभार घेताच धाडसी कारवाई केल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.