आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:सिद्धेश्वर विद्यालयात प्रवेश प्रक्रियेदरम्यान झाली होती कारवाई; विद्यार्थ्यांची मात्र कोंडी

माजलगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिद्धेश्वर विद्यालयात प्रवेशासाठी डोनेशन घेतले जात असल्याच्या तक्रारीवरून १४ जून रोजी आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलिस, शिक्षणाधिकारी यांना सोबत घेऊन स्टिंग ऑपरेशन केले होते. या वेळी २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, टीसी व पावणेदोन लाखांची रोकड जप्त केली होती. दरम्यान, कारवाईला आठवडा उलटला असला तरी जप्त केलेले टीसी पोलिसांकडेच आहेत, त्यामुळे या २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत.

माजलगाव शहरातील सिद्धेश्वर विद्यालयात प्रवेशासाठी ५ ते १५ हजारांपर्यंत पैसे घेतले जात होते. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर १४ जून रोजी आमदार साेळंके यांनी पोलिस, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रवेश प्रक्रियेसाठी पैसे घेण्याचे ठिकाण असलेल्या एका मंगल कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केले होते. या वेळी पावणेदोन लाखांची रोकड आणि २५ विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठीचे अर्ज, टीसी व अन्य कागदपत्रे जप्त केली होती.

या प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला होता. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी हे अर्ज, टीसी अद्याप शाळा प्रशासनाकडे हस्तांतरित केलेले नाहीत, त्यामुळे शाळेनेही या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केलेले नाहीत. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले त्यालाही आता आठवडा होत आला आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी, पालक रोज शाळेत चकरा मारत आहेत. मात्र, कागदपत्रेच नसल्याचे कारण देत प्रवेश झाला नाही असे शाळा प्रशासन सांगत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थीचा योत काही दोष नसताना त्रास सहन करावा लागतोय.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
कारवाईदरम्यान जप्त केलेले २५ अर्ज, टीसी हे पोलिसांकडे आहेत. ते सर्व आमच्या कार्यालयाच्या ताब्यात घेतले जातील आणि विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
-लक्ष्मण बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव.

बातम्या आणखी आहेत...