आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:2 वर्षांनी गौरी मुखवटे, सजावट साहित्याने बाजारपेठ सजली ; 30 टक्क्यांनी भाववाढ

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर या वर्षी ज्येष्ठा गौरी मुखवटे व सजावट साहित्यांनी परळीची बाजारपेठ सजली असून वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे, मखर, रंगीबेरंगी पुष्पहार, विद्युत रोषणाई खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यावर्षी मुखवट्याच्या दरांत ३० % वाढ झाली असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद अधिक असल्याचे गौरी मुखवटे विक्रेते गजानन कोकीळ यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे विविध सण उत्सव हे मनाप्रमाणे साजरा करता आले नव्हते. अनेकांच्या घरी रुग्ण होते तर बाजारपेठांसह सार्वजनिक जीवनावर निर्बंध आल्याने खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता येणे शक्य नव्हते. यंदा मात्र, कोविडचे संकट बऱ्यापैकी दूर झालेले आहे. यासोबतच गेल्या महिन्याभरापासून प्रतीक्षा केल्यानंतर वरुणराजानेही तालुक्यात बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजारपेठांत सण, उत्सवांचा उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षांनी व या वर्षीच्या चांगल्या पावसामुळे गौरी-गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणपतीच्या आगमनानंतर आज शनिवारी (ता.३ सप्टेंबर) तीन दिवसांसाठी ज्येष्ठा गौरीचे आगमन होत आहे. परळी शहरात ज्येष्ठा गौरीचे मुखवटे विक्री करणारे सहा व्यावसायिक आहेत.

यावर्षी मुखवट्यामध्ये नविन व्हरायटी आलेल्या आहेत. यात अमरावती स्पेशल, देवसेना, ग्लॉसी, मॅट फिनिश या मुखवट्यांना अधिक मागणी आहे. परळी बाजारपेठेत हे मुखवटे अमरावती, बार्शी, पेण येथून आयात केले आहेत. गौरीसाठी लागणारे हात चोपी, मेंदी, प्लेन अशा प्रकारात उपलब्ध आहेत. ६०० रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंत मुखवट्याच्या किमती आहेत. तर सजावटीसाठी लागणारे मखर, पडदा हे साहित्य तीनशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे गौरी मुखवटे विक्रेते कोकीळ स्टील सेंटरचे मालक गजानन कोकीळ यांनी सांगितले. दरम्यान, ज्येष्ठा-कनिष्ठांच्या आगनासोबतच घरोघरी लगबग सुरु झाली असून गृहिणीही उत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या आहेत.

विवाहित मुलीला मुखवटे घेऊन देण्याची परंपरा
भारतीय सणांपैकी महत्त्वाचा सण असलेला ज्येष्ठा गौरींचे शनिवारी घरोघरी आगमन होत आहे. काही ठिकाणी उभ्या तर काही ठिकाणी आडवी पध्दतीने मांडणी करून गौरींचा सण साजरा केला जातो.लग्न झालेल्या मुलीला पहिल्या वर्षी माहेरहून गौरी मुखवटे देण्याची प्रथा आहे. परळी बाजारपेठेतून या वर्षी एक हजार पेक्षा अधिक मुखवट्यांची विक्री झाली आहे. याशिवाय देवीच्या समोर आरास करण्यासाठी विविध सजावटीच्या साहित्याची बाजारपेठही अगदी फुलून गेल्याचे चित्र दिसले.

बातम्या आणखी आहेत...