आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • After Corona, Now That Inflation Is Down, The Picture Will Change With The Moment; Hope For Traders, Gudipadva In The District Is Likely To Create Consciousness | Marathi News

गुढीपाडवा:कोरोनानंतर आता महागाईचे सावट, तरीही मुहूर्तामुळे चित्र बदलेल; व्यापाऱ्यांना आशा, जिल्ह्यात गुढीपाडव्यामुळे चैतन्य निर्माण होण्याची शक्यता

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज होणार आर्थिक उलाढाल!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा शनिवारी आहे. सध्या सराफा बाजारात ५० टक्केच ग्राहक दिसत असले तरी नवनवीन दागिने बाजारात विक्रीसाठी आले आहेत. लोखंड महागल्याने दुचाकी व चारचाकी बाजारात वाहनांच्या किमती वाढलेल्या आहेत. दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याने शोरूमचालकांनी वाढीव बुकिंग केलेली आहे. परंतु, चारचाकी वाहनासाठी ग्राहकांची मागणी असली तरी कंपन्यांकडे मागणीप्रमाणे वाहने उपलब्ध नाहीत. कपडा बाजारात ग्रामीण भागातील ग्राहक फारसे दिसत नसल्याने अजूनही शुकशुकाट आहे. जिल्ह्यातील बाजारात गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणून शनिवारी मोठ्या संख्येने ग्राहक खरेदी-विक्रीचे व्यवहार करतील, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

सराफा बाजारात तेजी-मंदीमुळे सध्या ५० टक्केच खरेदीदार दिसताहेत. बस सुरू नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदीसाठी फारसे दिसून येत नाहीत. लग्नासाठी आवश्यक दागिने करण्यासाठी वधू-वर पक्षाकडील लोक सोने खरेदीसाठी येताहेत. जिल्ह्यात तेराशेपेक्षा जास्त सराफा दुकाने आहेत. मागील वर्षी ताेळ्यामागे ४६ हजार ५०० रुपये भाव होता. एक वर्षात हाच भाव सहा हजारांनी वाढला. लोखंडाचे दर वाढल्याने यंदा दुचाकींच्या किमतीही वाढल्या. त्यातच पेट्रोलचा दर लिटरमागे ११७ रुपयांवर गेला. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसत आहे. चारचाकी वाहन बाजारात मागील वर्षी कोरोना संकटामुळे फारशी खरेदी-विक्री झाली नाही. परंतु, ही परिस्थिती बदलेल अशी आशा आहे. कापड बाजारातही फारसा उत्साह दिसून येत नाही.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला दागिने खरेदीसाठी गर्दी

नवीन दागिने आले बाजारात
गुढीपाडव्यामुळे सराफा बाजारात सोन्यात मढवलेला कोल्हापुरी साज, साऊथ हार, सुवर्ण कर्णफुले, टेम्पल चोकर, कलकत्ती चोकर हे दागिने बाजारात आलेत. खरेदीसाठी ग्राहक शनिवारी निश्चितच दिसतील.
-मंगेश लोळगे, जिल्हाध्यक्ष, सराफा असोसिएशन, बीड.

८० ग्राहकांनी केली दुचाकींची बुकिंग
पाडव्याच्या मुहूर्तावर मागील वर्षी २३० दुचाकी विकल्या. यंदा ५०० दुचाकी आणल्या असून शुक्रवारपर्यंत ८० दुचाकींची ग्राहकांनी बुकिंग केली. शनिवारी ही संख्या वाढेल. -अमर सारडा, व्यवस्थापक, रामरतन होंडा शोरूम, बीड.

आज १६ चारचाकी वाहनांची विक्री होईल
७० चारचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. शनिवारी १६ चारचाकी वाहने विक्री होतील. सध्या कंपनीकडे माल नसला तरी ग्राहकांची चारचाकी वाहनांची मागणी अधिक आहे.
-चिंतामणी खोड, जनरल मॅनेजर, सबलोक कार, जालना रोड, बीड.

आठ दिवसांत परिस्थिती बदलेल
गुढीपाडवा व लग्नसराईमुळे शालू, डिझायनर साड्या व सूट, पिवर सिल्क साड्या, इन्डोवेस्टन, शेरवानी विक्रीला अाहेत. ही परिस्थिती आठ दिवसांत बदलण्याचे संकेत दिसताहेत. -राजेश मौजकर, व्यापारी, मौजकर टेस्कटाइन, बीड

दिव्य मराठी एक्सप्लेनर

कशामुळे बीडच्या बाजारात फारशी उलाढाल दिसून येत नाही?
मार्च एंडलाच गुढीपाडव्याच्या सण आला. दोन महिन्यांपासून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार नसल्याने बाजारात म्हणावी तशी खरेदीसाठी आर्थिक उलाढाल होताना दिसत नाही.

शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हातात यंदा का नाही पैसा?
शासकीय अधिकारी, कर्मचारी, कर्जदारांनी बँकांचे हप्ते मार्चअखेर भरून आपले व्यवहार पूर्ण केले. त्यांच्या हाती आता पैसे राहिले नाहीत. त्यातच तीन दिवस बँका बंद होत्या. युक्रेन व रशिया युद्धामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनच्या दरवाढीमुळे महागाई वाढली.

ग्रामीण भागातील ग्राहक का नाही दिसून येत यंदा बीडच्या बाजारात?
जिल्ह्यातून आठ लाख ऊसतोड कामगार स्थलांतरित झाले. यंदा साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असल्याने उशिरापर्यंत साखर कारखाने ऊस गाळप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून १० टक्केही ऊसतोड कामगार गावी परतलेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...