आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा असावा कारभारी:निकालानंतर उमेदवारांनी हातात खराटे घेत गावात राबवली स्वच्छता मोहीम; केज तालुक्यातील पैठण गावामधील तरुणांच्या पॅनलचा अनोखा उपक्रम

अनंत वैद्य | बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केज तालुक्यातील पैठण येथे ग्रामपंचायत निकालानंतर स्वच्छता अभियान राबवण्यात आले

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. राज्यभर गुलालाची उधळण, ढोल-ताशांचे आवाज सुरू असतानाच एका गावात मात्र वेगळीच लगबग दिसून आली. विजयी सदस्यांनी ढोल-ताशांवर नाचणे टाळत हातात चक्क खराटे घेत गावात स्वच्छता सुरू केली. उमेदवारांची ही कृती पाहून गावकरीही अवाक् झाले. दिवसभरात या युवकांनी जमेल तितकं गाव स्वच्छ केलं.

बीडच्या केज तालुक्यातील पैठण येथे युवकांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीत तिसरी आघाडी पॅनल स्थापन केले. गावात ९ जागांसाठी मतदान झाले. यापैकी तरुणांच्या या आघाडीने ७ जागांवर दणदणीत विजय मिळवला. २०११ च्या जनगणनेनुसार २४०० लाेकसंख्या व ४३६ उंबरठे असलेले हे गावं. यापूर्वी निवडणूक म्हटलं की भांडणतंटे व्हायचे. गावात वाद व्हायचे. याला कंटाळलेल्या युवकांनी स्वत:चेच पॅनल उभे केले.

यांनी मिळवला विजय :

जयश्री रावसाहेब चौधरी, जनाबाई विजयकुमार चौधरी, किशोर लक्ष्मण सरवदे, बाबासाहेब गंगाधर सरवदे, विजया विष्णू दीक्षित, हनुमंत भारत चौधरी, सुजाता नवनाथ चौधरी यांनी बाजी मारली.

परिवर्तनाची संधी मिळाली, गावाच्या विकासासाठी सज्ज

वॉटर कप स्पर्धेत आम्ही सर्वांनी योगदान दिले होते. विकासाची आम्हा सुशिक्षित तरुणांची तळमळ सर्व ग्रामस्थांना समजली. यातूनच त्यांनी ग्राम परिवर्तनासाठी आम्हाला संधी दिली. आता आम्ही गावाचा कायापालट करणार आहोत. - रुस्तुम चौधरी, पॅनल सदस्य, पैठण

प्रचारादरम्यान हा राबवला अजेंडा

प्रचार करताना युवकांनी शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी गाव परिसरात नदी खोलीकरण, रुंदीकरण, जलयोजनेची व्यवस्था, पाझर तलावाची दुरुस्ती, गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव व्यसनमुक्त करणे हा अजेंडा युवकांनी घरोघरी पोहोचवला. ग्रामस्थांना नेहमीच्या चेहऱ्यांपेक्षा युवकांनी दिलेल्या पॅनलचे नवीन चेहरे पसंतीस उतरले.

बातम्या आणखी आहेत...