आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:मामांच्या पश्चात भुकेल्यांसाठी भाच्याने सुरू केला अन्नदानाचा यज्ञ

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड बसस्थानकात अमित मिसाळ यांच्या पुढाकाराने खिचडी वाटप पुन्हा सुरू

बीडचे बसस्थानक. घड्याळात रात्री आठ वाजेचा ठोका पडला की भागवत सानप व त्यांचे सहकारी खिचडीचे मोठे भांडे घेऊन येणार व गरजूंना वाटप करणार. पाच वर्षे अखंडित चाललेला अन्नदान यज्ञ ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सानप यांच्या निधनाने खंडित झाला. मात्र, त्यांच्या पश्चात भुकेल्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने सानप यांचे भाचे अमित मिसाळ यांनी पुन्हा एकदा हा अन्नदानाचा यज्ञ सुरू केला आहे. यातून निराश्रित व भुकेल्यांच्या पोटी दोन घास जाताहेत.

बीड येथील भागवत अंबादास सानप यांनी २०१६ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड येथील बसस्थानकात खिचडी वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता. वंचित, भटके यांच्यासह भुकेल्या प्रवाशांना दोन घास मिळावेत या दृष्टीने रोज सायंकाळी दहा किलो तांदळाची खिचडी ते रोज रात्री आठ वाजेच्या सुमारास बसस्थानकात आणत. बसस्थानकातून उद‌्घोषणा करत प्रवाशांना तसेच भुकेल्यांना खिचडीचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले जात असत. उन्हाळा, हिवाळा असो किंवा पावसाळा एकही दिवस न चुकता हा अन्नदानाचा यज्ञ सुरू होता. अनेक निराश्रितांसाठी तर रात्री आठ वाजेची वेळ म्हणजे बसस्थानकात देवदूत अन्न घेऊन येतो अशीच स्थिती होती. दरम्यान, ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सानप यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात अन्नदान यज्ञात खंड पडला. मध्यंतरीच्या काळात सानप यांचे भाचे अमित चांगदेव मिसाळ यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा मनोदय मांडला. त्यानुसार ७ मार्च रोजी भागवत सानप यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत खिचडी वाटप करण्यास सुरुवात केली. सध्या दररोज सात किलो तांदळाची खिचडी तर उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीची व्यवस्था केली जात आहे. या कामी मिसाळ यांच्यासह बाळू सानप, सचिन कांबळे, सुमीत मिसाळ, प्रवीण मुंडे हेदेखील योगदान देत आहेत.

मामांची कायम आठवण येते
माझे मामा भागवत सानप हे समाजाच्या मदतीसाठी कायम धावून जात. त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खिचडी वाटप सुरू केले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांचे हे कार्य सुरू ठेवण्यासाठी मी सहकाऱ्यांसह ७ मार्चपासून खिचडी वाटप सुरू केले आहे. भुकेल्यांसाठी हा उपक्रम अव्याहत सुरू ठेवणार आहे.’-अमित मिसाळ, बीड.

कोरोना नियमांचे पालन

भागवत सानप यांचा भाचा अमित मिसाळ हा बीड शहर परिसरात हॉटेल चालवतो. दैनंदिन काम उरकल्यानंतर सायंकाळी खिचडी बनवण्याची लगबग सुरू होते. बरोबर आठ वाजता खिचडीचे भांडे व तीन ते चार सहकारी बसस्थानकात येतात. फिजिकल डिस्टन्सिंग व कोरोनाचे नियम पाळत खिचडी वाटप केली जाते.

बातम्या आणखी आहेत...