आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध गाव स्पर्धा:जलसंधारणानंतर आता जिल्ह्यातील 125 गावांत येणार ‘गटशेती’चे तुफान; वडवाडी व राळेगणसिद्धी येथे घेण्यात आले प्रशिक्षण

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०१६ पासून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो गावांत जलक्रांती घडवून आणल्यानंतर आता पाणी फाउंडेशनच्या वतीने समृद्ध गाव स्पर्धेत गटशेतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढावे, या दृष्टीने ही स्पर्धा पार पडणार असून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी १२५ गावांत आता गटशेतीचे तुफान येणार आहे.

अवर्षणग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यात जलक्रांती साधली जावी, यासाठी वर्ष २०१६ पासून वॉटर कप स्पर्धा उपयुक्त ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी होत शंभराहून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली. श्रमदान व पाणी फाउंडेशनची मदत या दोहोंमुळे नदी खाेलीकरण, रुंदीकरण, समतल चर, डीप सीसीटी, बंधारे उभारणे अशी अनेक कामे केली. आता गेल्या वर्षभरापासून समृद्ध गाव स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व कळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १५ मेपासूनच गटांची नोंदणी करत हा उपक्रम सुरू होत आहे.

समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर, आष्टी व बीड या तालुक्यातील १२५ गावांसाठी हा गट शेती उपक्रम राबवण्यात येत आहे. २० शेतकऱ्यांचा गट करत उत्पादन घेतले जाणार आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर संबंधित १२५ गावांतील जलमित्र, सरपंच, प्रगतिशील शेतकरी, तरुण वर्ग, बचत गटाच्या महिला सदस्या यांना अंबाजोगाई, वडवाडी व राळेगणसिद्धी येथे तीनदिवसीय प्रशिक्षणही देण्यात आले. हा उपक्रम जिल्ह्यात गटशेतीची चळवळ गतिमान करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

२५ लाखांचा फार्मर कप : फार्मर कप स्पर्धेत प्रथम ठरणाऱ्या गटाला राज्य पातळीवर पहिले पारितोषिक २५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक १५ लाख रुपये व तृतीय पारितोषिक १० लाख रुपये देण्यात येणार आहे. तालुका पातळीवर एक लाखाचे पहिले पारितोषिक दिले जाणार आहे. त्यामुळे या १२५ गावांतील शेतकरी तयारीला लागले असल्याचे सध्या दिसून येत आहेत.

शेतकऱ्यांना असे दिले प्रशिक्षण
मागील आठवड्यात तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून १२५ गावांतील विविध घटकांना शेतकरी गट निर्मिती, शेतीतील अडचणी, बीजप्रक्रिया करणे, उगवण क्षमता तपासणी, नैसर्गिकरीत्या कीड व्यवस्थापन करणे, खत व्यवस्थापन, विपणन यंत्रणा आदींविषयी माहिती देण्यात आली. यासह गटशेतीवरील चित्रफीतही सादर करण्यात आली.

२०० मार्कांची स्पर्धा : फार्मर कप स्पर्धा २०० मार्कांची असणार असून ती खरीप पीक उत्पादनावर आधारित असणार आहे. गटशेती, कावड पद्धत, कीड व्यवस्थापन, खर्च कमी आणि उत्पादन जास्त अशा विविध निकषांवर गुण दिले जाणार आहेत. १५ मे रोजी गटप्रमुख शेतकऱ्याने निमंत्रक म्हणून अर्ज सादर करावा. त्यानंतर पाणी फाउंडेशनच्या वतीने दुसरा अर्ज पाठवत २० शेतकऱ्यांची नावे मागवली जातील. या सर्व शेतकऱ्यांचे एकत्रित किमान २५ एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

गटशेतीतून गावाचा कायापालट करा
बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १२५ गावे फार्मर कप स्पर्धेत सहभागी आहेत. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांनी या गटशेती स्पर्धेत सहभागी व्हावे. पाण्याचा प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवण्याचे काम केले आता गटशेतीतून उत्पादन, उत्पन्न वाढवून गावाचा कायापालट करूया.
- संतोष शिनगारे, मराठवाडा समन्वयक, पाणी फाउंडेशन.

बातम्या आणखी आहेत...