आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालयानंतर लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ७० वृद्ध रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असणार असून रुग्णांची ने-आण, निवास व भोजनाची सोय मोफत असणार आहे. आजादी का अमृत महोत्सवांतर्गत राज्यात सर्वाधिक शस्त्रक्रिया होणारे हे शिबिर ठरणार असल्याचा विश्वास डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केला. शिबिरात नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे हे रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करणार आहेत.
शिबिरासाठी रुग्णांची ने-आण करण्याबरोबरच त्यांची चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था अंबाजोगाईच्या मानवलोक या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी लातूर येथील वळसे पाटील यांनीही मनुष्यबळ पुरवण्याची ग्वाही दिलेली आहे. शिबिरात रुग्णांची रक्तदाब, साखर आदी प्राथमिक तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत सुरू केली असून आवश्यक साधनसामग्रीची पूर्तता रुग्णालयात केली आहे.
लोखंडीच्या दोन्ही केंद्रांत रुग्णसेवा सुरळीत : जिल्हा रुग्णालयानंतर जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत लोखंडी येथील वृद्धत्व आजार व मानसोपचार रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय या दोन मोठ्या आरोग्य संस्थांची उभारणी झाली. मागील वर्षी कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले होते. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे उपचार केले होते. आता कोरोनाची लाट ओसरल्याने या ठिकाणी नियमित आरोग्यसेवा सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.