आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोडणी:आजपर्यंतची सर्व सरकारे फसवी; आता लढ्याशिवाय पर्याय नाही : डॉ. कराड

माजलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजवरच्या सगळ्या राज्य सरकारांनी ऊसतोडणी कामगारांची फसवणूकच केली आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांना सोडवून घेण्यासाठी संघटित लढ्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून ऊसतोडणी कामगार संघटनेच्या नेतृत्वात आपण हा लढा पुढे घेऊन जाऊया, असे प्रतिपादन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केले.माजलगाव शहरात झालेल्या राज्यस्तरीय ऊसतोड कामगार परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. कराड बोलत होते. या वेळी मंचावर परिषदेचे अध्यक्ष दत्ता डाके, सीटूचे राज्य सरचिटणीस एम.एच. शेख, सुभाष जाधव, आबासाहेब चौगले, नामदेव राठोड, मोहन जाधव, ऍड. अजय बुरांडे, मारोती खंदारे, पांडुरंग राठोड, मुसद्दीक बाबा, अशोक राठोड, मनीषा करपे, बी. जी. खाडे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कराड म्हणाले की, सत्ताधारी पक्ष आणि सगळेच आमदार, खासदार हे आपल्या हिताचे नाहीत. आपल्यालाच आपला लढा पुढे न्यायचा आहे. सन २००१ पासून ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची मागणी आपल्याच संघटनेने केली होती. ती आपण मान्य करून घेतली. अजूनही इतर मागण्यांसाठी आपल्याला संघर्ष मजबूत करावं लागणार आहे. परिषदेच्या निमित्ताने शहरात वाहन रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजी चौक ते बीड रोड, बस स्थानक, छत्रपती शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौक मार्गे जुन्या मोंढ्यातील वैष्णवी मंगल कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीने शहरातील वातावरण चांगलेच घोषणामय झाले होते. परिषदेने २० सप्टेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे.

तसेच गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याणकारी महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करा, कामगारांची नोंदणी करा, कामगारांना प्रत्यक्ष लाभ द्या. महागाईच्या प्रमाणामध्ये ऊसतोडणीचे दर वाढवून मुकादमाचे कमिशन व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या प्रमाणात वाहतुकीचे दर वाढवा. ऊसतोडणी कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करून बांधकामासाठी पाच लाख रुपये अनुदान द्या आदी ठराव मांडले. परिषद यशस्वीतेसाठी ऍड. सय्यद याकुब, सुदाम शिंदे, डॉ. अशोक थोरात, काशीराम सिरसट, सुहास झोडगे, गंगाधर पोटभरे, मुरलीधर नागरगोजे, बाळासाहेब चोले, अंगद खरात, संतोष जाधव, ओम पुरी, लहू खारगे, फारूक सय्यद, विजय राठोड, मीराताई शिंदे, शिवाजी जाधव, मधुकर आडागळे आदींनी परिश्रम घेतले.

ऊसतोड कामगारांची व्होट बँक म्हणून वापर : जाधव ऊसतोडणी कामगारांच्या हक्कासाठी आपण कायम संघर्षशील आहोत. तळागाळातील ऊसतोडणी कामगाराला ही सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी आपण लढा अधिक तीव्र करू. जिल्ह्यातील तथाकथित पुढारी हे ऊसतोड कामगारांची फक्त व्होट बँक म्हणून वापर करतात. त्यांनाही त्यांची जागा दाखवायची गरज आहे, असे मोहन जाधव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...