आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलगर्जी:अंबाजोगाईतील ‘स्वाराती’ रुग्णालयात दीड तासात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू; ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

अंबाजोगाई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गत आठवड्यापासून येथे होता ऑक्सिजनचा तुटवडा

एकीकडे नाशिकच्या ऑक्सिजन गळतीने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड कक्षात बुधवारी (दि.२१) दुपारी दीड तासात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने सर्व मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी केला, तर नातेवाइकांचे आरोप चुकीचे असून रुग्ण गंभीर आजारी होते, त्यांचे वय अधिक होते म्हणून ते उपचारादरम्यान दगावले, असा दावा करत प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णालयाचा मृत्युदर अधिक आहे.

मागील आठवड्यापासून येथे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. बुधवारी दिवसभरात १४ कोरोना रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, १२.४५ ते २.१५ या वेळेत दीड तासात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह आल्यास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जातो. आजच्या घटनेतील मृत रुग्णांची मात्र घाईगडबडीत अँटिजन चाचणी करून मृतदेह नातेवाइकांकडे सोपवल्याने प्रशासन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय गडद झाला आहे.

असे झाले सात जणांचे मृ़त्यू
पहिला मृत्यू : वॉर्ड क्रमांक १, वेळ : १२ वाजून ४५ मिनिटे
दुसरा मृत्यू : वॉर्ड क्रमांक ३ वेळ : १ वाजून ४० मिनिटे
तिसरा मृत्यू : वॉर्ड क्रमांक ३ वेळ : १ वाजून ४५ मिनिटे
चौथा मृत्यू : वॉर्ड क्रमांक १, वेळ : १ वाजून ४५ मिनिटे
पाचवा मृत्यू : वॉर्ड क्रमांक १ , वेळ : १ वाजून ५५ मिनिटे
सहावा मृत्यू : वॉर्ड क्रमांक १, वेळ :२ वाजून ०४ मिनिटे
सातवा मृत्यू : वॉर्ड क्रमांक १, वेळ : २ वाजून २५ मिनिटे

रुग्णालय प्रशासनाचा दावा, रुग्ण गंभीर आजारी असल्यानेच गेले जीव

  • नाशिकच्या दुर्दैवी घटनेत राज्य शासनाने वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. याच धर्तीवर येथील मृतांच्या वारसांना मदत द्यावी व या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. - नमिता मुंदडा, आमदार, अंबाजोगाई.
  • ऑक्सिजन मुबलक होता. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुरवठा बंद पडून रुग्णांचा मृत्यू झाला. वेळोवेळी केलेले कॉल अधिष्ठातांनी उचलले नाहीत. या मृत्यूंना रुग्णालय जबाबदार आहे. - वैजनाथ शामराव सुरवसे, परळी.
  • बुधवारी रात्री १२ पासून ११ जणांचा मृत्यू झाला. दमा, उच्चरक्तदाब व शारीरिक व्याधीमुळे मृत्यू झाले. बहुतांश रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे. - डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, अंबाजोगाई.

हिंगोलीत आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन
जिल्ह्यात असलेल्या ३४० रुग्णांसाठीचा ऑक्सिजन गुरुवारी दुपारपर्यंत संपणार अाहे. आता साध्या ऑक्सिजन सिलिंडरवर रुग्णांचे ऑक्सिजन बॅकअप घेण्याची धावपळ सुरू झाली. तर बाहेरराज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. शासकीय रुग्णालय, हिंगोलीतील डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, वसमत उपजिल्हा रुग्णालय व कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात अाॅक्सिजनवरील रुग्ण अाहेत.या रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगोलीत दोन तर वसमत व कळमनुरी येथेही ऑक्सिजन टँक उभारले आहेत. हिंगोलीत सर्वात जास्त ३ केएल ऑक्सिजन दररोज लागतो तर येथे टँकची क्षमता १३ केएलची आहे.

बातम्या आणखी आहेत...