आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:अंबाजोगाईतील आरटीओचा ट्रॅक खचला; 20 लाखांचा खर्च वाया

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोखंडी सावरगाव शिवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्च करून वाहनांच्या ड्रायव्हिंग टेस्ट व फिटनेस तपासणीसाठी आरटीओचा ट्रॅक बाधंला, परंतु पाच वर्षांत या ट्रकची दुर्दशा झाली आहे. सध्या या ट्रॅकवर विविध ठिकाणी खड्डे पडल्याने तो खचला आहे. त्यामुळे या परिसराला उकिरड्यासारखी अवकळा आली आहे. याच ट्रॅकवर सध्या आरटीओकडून दररोज ७० वाहनांची ड्रायव्हिंग टेस्ट केली जात असून ३० वाहनांना फिटनेसचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

येथील आरटीओ कार्यालय जोगाईवाडी शिवारात, तर लोखंडी सावरगाव शिवारातील चार किलोमीटरमध्ये वाहनांचा ट्रॅक आहे. पाच वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्च करून साडेसात मीटर रुंद व दोनशे मीटर लांबीच्या ट्रॅकची दुर्दशा झाली आहे. मुख्य रस्त्यावरून ट्रॅकवर उतरताना वाहनांना मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे मागील १८ वर्षांत येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वत:ची जागा मिळू शकली नसून हे कार्यालय आजतागायत किरायाच्या इमारतीमध्येच सुरू आहे.

कशी असेल नवीन इमारत
आरटीओच्या नवीन इमारत बांधकामासाठी दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ११ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या शिंदे सरकारने केज मतदारसंघातील सर्वच कामांना स्थगिती दिली होती. लोखंडी सावरगाव शिवारातील दहा एकर जागेत हे कार्यालय उभारण्यात येणार आहे. दोन मजली मुख्य कार्यालयीन इमारतीसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, मुख्य इमारत फर्निचर, सोलार पॅनल, अग्नी सुरक्षा उपकरणे, रेन हार्वेस्टिंग या सुविधा असणार आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ, तर वाहनांच्या चाचण्यांसाठी चार ‌अद्ययावत ट्रॅक असतील.

१६ हजार जादा शुल्क
जुन्या सहा व आठचाकी वाहनांच्या फिटनेससाठी १३ हजार ५०० रुपये असे शासकीय शुल्क असताना येथे आरटीओकडून १६ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.
नव्या ट्रकसाठी ८५० रुपये शासकीय शुल्क असले तरी आरटीओकडून १५०० रुपये आकारले जात आहे.
पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या चारचाकी वाहनास जर पाच वर्षांची मुदत वाढवण्यासाठी ७ हजार रुपये शासकीय शुल्क असताना आरटीओकडून १० हजार रुपये आकारले जात आहेत.

पाच ते सहा दिवसांत कामावरील स्थगिती उठेल
मागील आठवड्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बांधकाम वगळता इतर सर्व मंजूर झालेल्या कामांवरची स्थगिती उठवली गेली आहे. २ नोव्हेंबर २०२२ रोजी या कामाच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांना आमदार नमिता मुंदडा यांनी निवेदन दिले आहे. पाच-सहा दिवसांमध्ये स्थगिती उठेल. निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होईल. -पी. सी. पाटील, अभियंता, सा. बां. विभाग, अंबाजोगाई

निधी मंजूर, परंतु काम सुरू झालेले नाही
सध्याचा ट्रॅक पुरेसा असून दोन वर्षांपूर्वी ११ कोटी रुपयांचा निधी कार्यालय इमारत, ट्रॅक व इतर सुविधांसाठी मंजूर झाला आहे. अद्याप काम सुरू झालेले नाही. -शेखर आचार्य, सहायक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई

बातम्या आणखी आहेत...