आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच विकासकामांची प्रलंबित देयके वाटप करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी एक वाजता ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे कंत्राटदार धमक्या देतात, कट्यार दाखवून बळजबरीने सह्या घेतात. त्यामुळे कामकाज करता यावे म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पिस्तूलच्या परवान्याची मागणी कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याने केली हाेती.
अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागात संजयकुमार कोकणे हे जानेवारी महिन्यात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती.
त्यामुळे संबंधित तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची पडताळणी केली होती. पडताळणीअंती बुधवारी (२२ जून) अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दुपारी एक वाजता कोकणे हे कार्यालयीन काम करत असताना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. कोकणेंकडून कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा करणे असे प्रकार समोर आले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अंबाजोगाईच्या सा.बां. विभाग कार्यालयात कारवाई
६ महिन्यांपूर्वी रुजू झाले हाेते नाशिकचे कोकणे
अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून सहा महिन्यांपूर्वी संजयकुमार कोकणे हे नियुक्त झाले होते. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘मी जॉइन झाल्यानंतर लगेच ही मागणी केली होती. माझ्यासोबत असा कुठलाही प्रकार झालेला नाही. मात्र, यापूर्वीच्या येथील कामाचा आढावा घेतला. त्या वेळी मला येथे अशा प्रकारे लोक बिले वसूल करतात, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे मी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी सहा महिन्यांपूर्वी दिली होती.
पिस्तूल परवान्याच्या पत्रात काय लिहिले होते ?
अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे. कार्यालयात येऊन कंत्राटदार धमक्या देतात, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात. त्यामुळे आपल्याला कामकाज करता यावे यासाठी पिस्तूल देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र १२ जानेवारी २०२२ कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांना लिहिले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.