आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सातत्याने समोर येत असलेले गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात प्रकरणांमुळे आरोग्य विभागाने आता जिल्ह्याकडे लक्ष वळवले. परळी येथील घटनेची राज्याच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्याच्या सूचना आरोग्य संचालकांनी दिल्यात. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तपासणीचे आदेश काढले आहेत. केंद्रांच्या वर्षभराच्या रेकॉर्डची आता झाडाझडती घेतली जाणार आहे.
परळीच्या सुदाम मुंडे प्रकरणानंतर पोरींना गर्भात मारणारा जिल्हा अशीच ओळख होऊन जिल्ह्याच्या माथी कलंक लागला होता. प्रशासनाच्या जनजागृतीमुळे मागील काही वर्षांत स्त्री जन्मदरात वाढ झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांत सातत्याने स्त्री जन्मदर घटत चालल्याची बाब पीसीपीएनडीटी समितीच्या जिल्हा दौऱ्यात समोर आली होती. त्यातच जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी बकरवाडी येथील सीताबाई गाडे या गर्भवतीचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणात गर्भलिंगनिदान करणारी साखळी समोर आली होती. या प्रकरणामुळे पुन्हा बीड गर्भलिंगनिदान प्रकरण, अवैध गर्भपात या बाबींसाठी चर्चेत आले होते.
हे प्रकरण शांत होत नाही तोच परळीतही एका विवाहितेचा गर्भलिंग करून गर्भपात केल्याची घटना या आठवड्यात समोर आली. या प्रकरणामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली. पत्र पाठवून तपासणी करण्याचे दिलेत आदेश आरोग्य संचालकांनी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र पाठवून तपासणी करण्याचे आदेश दिलेत. वर्षभरात झालेल्या सोनोग्राफी, गर्भपात विशेषत: १२ आठवड्यांवरील झालेले गर्भपात याबाबत तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आणखी काही प्रकार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गर्भपात गोळ्यांची विक्री, औषध प्रशासनालाही पत्र
बीड जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांची अवैध विक्री होत असल्याचे समाेर आले आहे. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात १९ आठवड्यांचा गर्भ असलेली महिला गंभीर अवस्थेत आली होती. जिल्ह्यात अवैधपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याने याबाबत तपासणी करून मेडिकलवर कारवाईसाठीही जिल्हा शल्यचिकित्सकांनी औषध विभागाला पत्र दिले.
दररोज अहवाल देण्याच्या सूचना
तपासणी मोहिमेत वैद्यकीय अधीक्षकांना दररोज किती सोनोग्राफी आणि किती गर्भपात केंद्रांची तपासणी केली आहे, याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना द्यावा लागणार आहे. याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रातही याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे.
...तर दोषींवर कारवाई करणार
जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी केंद्रे व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी होत असते. आता एक वर्षाच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात दोषी सापडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.