आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूमोनियामुळे दाखल तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालय कर्मचाऱ्यांनी किटमध्ये पॅक ठेवला. काही वेळानंतर एक मृतदेह त्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. ताेवर बीडमध्ये अंत्यसंस्काराची तयारीही झालेली. मात्र, घरी आल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी किटमधून बाहेर काढताच ताे आपल्या व्यक्तीचा नसल्याचे नातलगांच्या लक्षात येताच सगळेच अवाक् झाले. शवागारातून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह दिल्याचे कळल्यानंतर मध्यरात्री नातेवाइकांना पुन्हा बीड ते अंबाजोगाई असे शंभर किलोमीटर फेरा मारून मूळ मृतदेह आणून अंत्यसंस्कार पार पाडले. अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयाच्या गलथानपणामुळे हा प्रकार घडल्याचे नातलगांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे नातेवाइकांनीच मृतदेह नीट न ओळखल्याने हा प्रकार घडला, असे सांगत स्वारातीने चाैकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली.
बीड शहरातील ३२ वर्षीय तरुण अफराेज शेख याची प्रकृती बिघडल्याने त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. शनिवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नातेवाइक येईपर्यंत शवागारात ठेवला होता. स्वारातीच्या शवागाराची १४ मृतदेहांची क्षमता आहे. सध्या इथे सात कोविड आणि सात नॉन कोविड अशी विभागणी केलेली आहे. बीडच्या तरुणाचा मृतदेह शवागारात ठेवला होता तिथेच परळी तालुक्यातील एका व्यक्तीचा मृतदेहही ठेवलेला होता. परळीच्या मृताचे नातेवाइक सकाळी येणार होते. दरम्यान, अफराेजचे नातेवाइक अंबाजाेगाईला स्वारातीमध्ये आल्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी शवारागारात प्लास्टिक किटमध्ये पॅक केलेला मृतदेह त्यांच्या हवाली केला गेला. रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान बीडमध्ये पाेहाेल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह किटमधून बाहेर काढला. मात्र तो अफराेजचा नव्हे तर दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. त्यामुळे एकच धांदल उडाली. रुग्णालयात परत येऊन मध्यरात्री शंभर किलोमीटर माघारी येऊन नातेवाइकांनी अफराेजचा मृतदेह बीडला नेला.
नातेवाइकांची चूक : प्रशासनाचा दावा
दरम्यान, मृतदेह पॅक करण्याआधी ताे एका नातेवाइकाला दाखवला होता. त्यांनीच ताे परत नेताना नीट न ओळखल्याने हा गोंधळ झाल्याचा दावा स्वाराती रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मात्र नातेवाइकांनी हा दावा फेटाळून लावत यात स्वाराती प्रशासनाची चूक असून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने सत्य लवकरच उजेडात येईल.
दुसरा मृतदेह कुणाचा?
अफराेजचा समजून बीडला नेलेला मृतदेह माघारी आणून स्वारातीच्या शवागारात ठेवण्यात आला. परंतु हा माघारी आलेला मृतदेह कुणाचा याचे काेडे रविवारी रात्री उशिरापर्यंत सुटले नव्हते. मुळात परळीच्या या रुग्णाचा मृत्यू स्वारातीत झालेलाच नाही. स्वाराती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केवळ २५ रुपयांचे शुल्क स्वीकारून ताे मृतदेह सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. ताे मृतदेह कुणी आणून ठेवला, काेणी पावती फाडली याचा काेणालाही रात्री उशिरापर्यंत ताळमेळ लागला नव्हता.
त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी
मृतदेहाची अदलाबदल झाल्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. यासाठी वरिष्ठ प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याबाबत नियमावली आहे. तिची अंमलबजावणी झाली का, हेही तपासले जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. - डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता स्वाराती, अंबाजोगाई
चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन, रुग्णालय म्हणते नातेवाइकांनीच ओळखला नाही मृतदेह हे कितपत याेग्यॽ
बाहेर मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह राखण करण्यासाठी स्वाराती रुग्णालयात स्वीकारणे कितपत याेग्य, हा प्रश्न आवर्जून उपस्थित हाेत आहे. एखाद्या मृत व्यक्तीचे नातलग दूर गावी किंवा विदेशी राहत असल्यास येईपर्यंत मृतदेह खराब होऊ नये म्हणून स्वाराती रुग्णालयात नेऊन ठेवतात. रुग्णालय प्रशासन त्यांच्याकडून २५ रुपये शुल्क आकारून मृतदेह राखण करण्यासाठी स्वीकारतात. मात्र, बाब कितपत याेग्य आहे, यावर रुग्णालयातील काेणताही अधिकारी बाेलण्यास तयार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.