आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती मागवली:0 ते 20 पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील  तब्बल 633 शाळा बंद होण्याच्या मार्गावर!

अमाेल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शून्य ते २० पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद करुन त्यांचे शेजारच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, यू डायस नुसार सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी, सामाजिक न्याय विभागाच्या अशा एकूण ६३३ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. या शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व शाळांची फेर तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ज्या शाळांची पटसंख्या वाढलेली नाही त्यांचे शेजारच्या शाळेत समायोजन केले जाणार आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील कमी पट संख्येच्या शाळा बंद करुन त्या शाळेतील विद्यार्थी शेजारच्या शाळेत समायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शिक्षण उपसंचालकांनीच २० सप्टेंबरला शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या होत्या. यू डायस या विद्यार्थी नोंदणीच्या प्रणालीनुसार, जिल्ह्यात सध्या ६३३ शाळा या २० पेक्षा कमी पट संख्येच्या असल्याचे दिसून येत आहे यामध्ये, जिल्हा परिषदेच्या ६०५, सामाजिक न्याय विभागाची ०१, सामाजिक न्याय विभागांतर्गत असणारी खासगी १, विनाअनुदानित असलेल्या २ तर, स्वयंअर्थसहाय्यीत असलेल्या २३ शाळांचा समावेश आहे. दरम्यान, आधीच कोरोनानंतर जिल्ह्यातील अनेक भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत जाताना बस अभावी कसरत करावी लागत आहे.

अशा आहेत तालुकानिहाय शाळा
अंबाजोगाई ४०, आष्टी ५२, बीड १११, धारूर ३९, गेवराई ५०, केज ६५, माजलगाव ४८, परळी ३४, पाटोदा ८४, शिरूर ७८, बीड शहर ०३, वडवणी २९ अशा एकूण ६३३ शाळा या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आहेत.

शिक्षक समितीचे निवेदन
दरम्यान, राज्यातील २० विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळा बंद करू नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. या शाळांच्या प्रश्नासह शिक्षकांच्या प्रश्नाबाबतही निवेदन पाठवले गेेले आहे.

मंगळवारी सीईअो घेणार बैठक : दरम्यान, जिल्ह्यातील शाळांची तपासणी करुन आज सोमवार पर्यंत त्याची माहिती शिक्षण विभागाला देण्याचे आदेश गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची या विषयावर व्ही सी घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...