आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळाटाळ:नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ७२ टक्के वाहनचालकांनी अद्याप भरले नाही ई-चलान

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांकडून इ चलानमार्फत ऑनलाइन स्वरुपाचा दंड आकारला जातो मात्र हा दंड भरण्यासाठी वाहन चालकांची टाळाटाळ दिसून येत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात दंड झालेल्या वाहनचालकांपैकी तब्बल ७८ टक्के चालकांनी हा दंड भरला नसल्याचे समोर आले आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून इ चालान ही दंडासाठीची यंत्रणा सुरु करण्यात आली आलेली आहे मात्र, यातून केवळ दंडाचे आकडे वाढत असून प्रत्यक्षात दंड वसुली कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या ११ महिन्यांच्या काळात वाहतूक नियम मोडणाऱ्या २६ हजार ९८५ वाहन चालकांना इ चलान यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला आहे.

दंडाचा हा आकडा तब्बल २ कोटी १६ लाख ३ हजार ५०० रुपये इतका मोठा आहे. दरम्यान, दंडाचा आकडा मोठा असला तरी प्रत्यक्षातील दंड वसुली केवळ २८% आहे. दंड झालेल्या वाहनधारकांपैकी ११ हजार ९७० वाहनधारकांनी ६० लाख ६१ हजार ५० रुपयांचा दंड भरला आहे तर, १४ हजार ८९० वाहन चालकांकडे अद्यापही १ कोटी ५५ लाख ४२ हजार ४५० रुपयांचा दंड थकीत आहे.

८० जणांकडून आव्हान
दरम्यान, इ चलाननुसार दंड केला गेला असला तरी कधी कधी वाहनाचा क्रमांक चुकणे, एकाच क्रमांकाची दोन वाहने असणे किंवा चारचाकीचे चलान दुचाकीच्या क्रमांकावर जाणे असे प्रकारही घडतात. वाहन धारकाला दंडाचा मेसेज गेल्यावर आपण उल्लंघन केले नाही तर दंड कसा असा प्रश्न त्याला पडतो असे वाहनधारक वाहतूक शाखेत येऊन इ चालानला आव्हान देतात खात्री करुन त्यांचा दंड कमी केला जातो. ११ महिन्यांत ८० जणांनी अशा प्रकारे आव्हान दिले होते. त्याची दुरुस्ती केली गेली.

कसे तपासाल ई-चलान
ई चलानची माहिती echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळावर तपासता येईल. त्यावर ऑनलाइन सर्व्हिसेसच्या चेक चलान टॅबवर क्लिक करा. वाहनाचा नंबर, लायसन्स नंबर टाकून इ चालान एसएमएस पर्यायावर क्लिक करा. त्यानंतरही मेसेज आला नाही तर, डी एल किंवा व्हेइकल नंबरचा पर्याय निवडूण माहिती भरावी. गेट डिटेल्स वर क्लिक केल्यावर चलान पेंडींग असेल तर त्याची माहिती पहायला मिळू शकते.

फसव्या साइटपासून सावध राहा
इ चलानच्या फसव्या साईट पाठवून वाहन चालकांना इ चालान भरण्यास सांगून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला आलेल्या मेसेज च्या साइटबाबत खात्री करुनच इ चालान भरणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...